श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
IND VS ENG : २० जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या दरम्यान, भारतीय संघाची धुरा तरुण शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया आधीच इंग्लंडमध्ये पोहचली आहे. अशा परिस्थितीत, गिल आणि कंपनीसाठी हा दौरा खूप आव्हानात्मक ठरणार असल्याचे बोलले जाता आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंशिवाय नव्या दमाच्या टीम इंडियाकडे या दौऱ्यात अनुभवाची कमतरता दिसून येत आहे. तत्पूर्वी, श्रेयस अय्यरला या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. त्यावरून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने संताप व्यक्त केला आहे.
श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२५ स्पर्धेत देखील त्याने आपल्या नेतृत्वासोबतच फलंदाजीने देखील सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली होती. याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये देखील अय्यरने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. तरी देखील इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने अय्यरला इंग्लंड दौऱ्यापासून दूर ठेवल्याबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे.
सौरव गांगुली यांनी रेव्हस्पोर्ट्सशी संवाद साधला तेव्हा सांगितले की, “श्रेयस अय्यर गेल्या एक वर्षापासून शानदार क्रिकेट खेळत आहे आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघात तो असायला हवा होता. गेल्या एक वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. श्रेयससारख्या क्षमतेच्या खेळाडूला बाहेर ठेवायला नको होते. तो सध्या दबावाखाली चांगल्या धावा काढत आहे आणि जबाबदारी देखील घेत आहे. यासोबतच, तो शॉट बॉलवरही चांगला खेळताना दिसतो. जरी कसोटी क्रिकेट थोडे वेगळे असले तरी मला त्याला इंग्लंड मालिकेत असायला हवे होते.”
हेही वाचा : WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथ एक्सप्रेस सुसाट! लॉर्ड्सवर ४० धावा काढताच डॉन ब्रॅडमनचा विक्रम खलसा..
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड असणार आहे. पण, तुम्हाला हे समजून घ्यायल हवे की, तुम्ही त्याला सतत गोलंदाजी करायला लावू शकत नाही. कर्णधार शुभमन गिलला हे समजून घ्यावे लागणार आहे. तुम्हाला बुमराहचा वापर हा विकेट घेण्यासाठी करावा लागणार आहे.” असे देखील गांगुली म्हणला आहे. तो पुढे म्हणाला की, “तुम्ही जसप्रीतला एका दिवसात १२ पेक्षा जास्त षटके गोलंदाजी करायला लावू नये. इतर गोलंदाजांना पुढे येऊ द्या. जर तुम्ही बुमराहला थांबवण्यास यशस्वी ठरलात आणि त्याचा विकेट घेणारा गोलंदाज म्हणून वापर केलात तर तुम्हाला जिंकण्याची अधिक चांगली शक्यता असणार आहे.”