क्विंटन डी कॉक(फोटो-सोशल मीडिया)
South Africa vs Namibia : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू क्विंटन डी कॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, तो आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. परंतु, त्याचे पुनरागमन फारसे चांगले राहिले नाही. क्विंटन डी कॉकचा उत्कृष्ट फॉर्म असून देखील त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो पुन्हा दक्षिण आफ्रिकच्या जर्सीत परतला आहे.
टी२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यानंतर डी कॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी, त्याने स्पष्ट केले की तो आता फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. तथापि, काही महिन्यांनंतर, त्याने आपला निर्णय मागे घेऊन तो पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणार आहे. ही बातमी क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक नव्हती, कारण डी कॉक हा दक्षिण आफ्रिका संघाचा सर्वात अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर, क्विंटन डी कॉक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला खरा, परंतु त्याची सुरुवात अपेक्षेनुसार राहिली नाही. नामिबियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात, डी कॉक फक्त १ धावा काढून माघारी गेला. त्याने त्याच्या डावात चार चेंडू खेळले. तो कोणत्याही गोलंदाजाला त्रास न देताच माघारी परतला. त्यामुळे तेचे चाहते निराश झाले आहेत.
डी कॉक हा दीर्घकाळापासून दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरचा महत्वाचा फलंदाज राहिला आहे. त्याची आक्रमक फलंदाजी आणि विकेटकीपिंगमुळे तो संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक बनला. तथापि, आता तो परतल्यानंतर, तो त्याचे पूर्वीचे स्वरूप परत मिळवू शकेल का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निवडकर्ते येत्या काही महिन्यांत त्याच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवणार कारण पुढील वर्षी टी-२० विश्वचषक आणि २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. जिथे त्याचा अनुभव दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यंत उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
नामिबियाच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. नामिबियासाठी हा सामना ऐतिहासिक असाच होता, कारण ते पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळत होते. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज नामिबियाच्या गोलंदाजांसमोर दम धरू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ २० षटकांत फक्त १३४ धावाच उभ्या करू शकला. ट्रम्पेलमन हा नामिबियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन विकेट्स घेतल्या. मॅक्स हींगोनेने दोन विकेट्स घेतल्या.