दिल्ली : काही महिन्यांपूर्वी ज्युनिअर कुस्तीपटू सागर घनकर याच्या हत्येप्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) सह १८ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी काल दिल्ली न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयानं हत्येप्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमारवर करण्यात आलेले आरोप निश्चित केले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण? :
दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियममध्ये ४ मे २०२२ च्या मध्यरात्री कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ज्यात सागर धनकर नावाच्या कुस्तीपटूचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचंही नाव समोर आले. तपासादरम्यान पोलिसांना एक व्हिडिओ सापडला, ज्यात सुशील कुमार सागर धनकरला मारहाण करताना दिसत आहे. यानंतर पोलीस सुशील कुमारचा शोध घेत होते. सागर घनकरच्या हत्येच्या २० दिवसानंतर आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक करण्यात आली होती.
हत्येप्रकरणी अटकेची कारवाई झाल्यानंतर सुशील कुमारला रेल्वेनंही नोकरीतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सुशील कुमारवर हत्येचा आरोप असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्यानं त्याला नोकरीवर ठेवता येणार नसल्याचं रेल्वेकडून कारण देण्यात आलं होतं. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केलं होतं. सागर धनकर हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.