ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेतील ग्रुप २ मध्ये मोठा बदल घडला आहे. नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिका संघावर १३ धावांनी विजय मिळवल्यामुळे पराभूत झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आता स्पर्धे बाहेर गेला आहे. त्यामुळे ग्रुप २ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाचे सेमी फायनल मधील स्थान आता निश्चित झाले आहे.
टी२० विश्वचषकात ४० वा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेदरलँडने २० षटकांत ४ बाद १५८ धावा केल्या. मात्र आफ्रिकेने संघाला ही धावसंख्या पार करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ विकेट्सवर केवळ १४५ धावाच करता आल्या.
नेदरलँडकडून पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सविरुद्धचा सुपर-१२ मधील शेवटच्या सामन्यात १३ धावांनी पराभव झालाय. त्यामुळे आफ्रिकन संघाचे पाच सामन्यांत केवळ पाच गुण झाले. आफ्रिकन संघाचा निव्वळ रनरेट +०. ८६४ वर घसरला. आफ्रिकेचा संघ बाद होताच भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.