डेहराडून : सध्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकीचे सामने सुरु आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने यजमान उत्तराखंड संघाचा ३-० असा धुव्वा उडवून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकी स्पर्धेतील महिलांच्या गटात धडाकेबाज सलामी दिली. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने बलाढ्य तामिळनाडू संघावर २-१ अशी मात केली.
उत्तराखंड संघाविरुद्ध महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत पहिल्या पंधरा मिनिटातच तीन गोल नोंदविले. उत्कृष्ट सांघिक कौशल्य आणि अचूकता याचा सुरेख मेळ घालीत महाराष्ट्राने या सामन्यात वर्चस्व गाजविले. सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच सानिका माने हिने फिल्ड गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. तिने उत्तराखंड संघाची गोलरक्षक आणि दोन बचाव खेळाडूंना चकवीत अप्रतिम गोल केला. या धक्क्यातून सावरत नाही तोच उत्तराखंड संघावर आणखी एक गोल नोंदविला गेला.
हिमांशी गावंडे हिने जोरदार चाल करीत खणखणीत फटका मारला आणि महाराष्ट्राचा दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या चौदाव्या मिनिटाला महाराष्ट्राला गोल करण्याची आणखी एक संधी लाभली या संधीचा पुरेपूर लाभ घेत दुर्गा शिंदे हिने गोल केला आणि महाराष्ट्राला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्राला तीन पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेता आला नाही. उत्तराखंड संघाला देखील दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र महाराष्ट्राच्या बचाव फळीने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. साखळी गटामध्ये महाराष्ट्राला झारखंड, मणिपूर, मिझोराम या संघांच्याही आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीनेच महाराष्ट्राचा आजचा विजय हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
महिलांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष खेळाडूंना तामिळनाडूविरुद्ध विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. हा सामना त्यांनी २-१ असा जिंकला. महाराष्ट्राकडून कर्णधार व ऑलिंपिकपटू देवेंद्र वाल्मिकी व रोहन पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला तामिळनाडू करून बी सतीश यांनी एकमेव गोल नोंदविला.
चुरशीने झालेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. दोन्ही संघांनी खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र मात्र त्यांना मध्यंतरापर्यंत यश मिळाले नाही. मध्यंतरानंतर महाराष्ट्राला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत देवेंद्र याने खणखणीत फटका मारून महाराष्ट्राचे खाते उघडले. मात्र त्याचा आनंद काही क्षणच टिकला कारण पुढच्याच मिनिटाला तामिळनाडूने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यांच्या आघाडी फळीतील खेळाडू बी. सतीश याने एकट्याने चाल करीत हा गोल नोंदविला.
त्यानंतर आघाडी घेण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या अखेर ४६ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली त्याचा पुरेपूर लाभ घेत रोहन पाटील याने महाराष्ट्राचा दुसरा गोल नोंदविला. ही आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भक्कम बचाव रक्षण करीत तामिळनाडूला बरोबरी साधण्यापासून वंचित ठेवले आणि शानदार विजय मिळविला.साखळी गटामध्ये महाराष्ट्राला उत्तराखंड, हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.