आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा बारामतीकरांना थरारक अनुभव(फोटो-सोशल मीडिया)
Pune Grand Tour 2026 : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ चा तिसरा टप्पा आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक राहिला आहे. पश्चिम घाटाच्या प्रवेशद्वारावर सायकलस्वारांच्या कौशल्याची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षाच पाहायला मिळाली. शर्यतीच्या या आव्हानात्मक तिसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा कॅमेरून निकोलस स्कॉट याने बाजी मारली. त्याने १३७ किलोमीटरचा हा टप्पा ३ तास ४ मिनिटे आणि १३ सेकंदांत पार करण्याची किमया साधली. अर्थात, क्रमवारीत अव्वल क्रमांक कायम राखून ल्यूक मुडग्वे याने ‘यलो जर्सी’ वरील वर्चस्व कायम राखले आहे.
हेही वाचा : भारत-बांग्लादेश वादावर BCCI अध्यक्ष मिथुन मनहास यांची प्रतिक्रिया Viral, पहा Video
बजाज ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार बारामतीकरांनी अनुभवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तसेच क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकासह इतर उपविजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सासवड येथून स्पर्धेचा प्रारंभ झाल्यानंतर सायकलपटूंनी बारामतीच्या दिशेने कूच केले आणि विद्या प्रतिष्ठानच्या पेन्सिल चौक येथील फिनिश लाईनच्या जवळ आले, तेव्हा शर्यत अधिक तीव्र झाली. तीन तास खेळाडूंमध्ये जबरदस्त चुरस बघायला मिळाली. यात स्कॉट सर्वांत वेगवान ठरला.
अंतिम टप्प्यात स्कॉटने वेग वाढवला. यात त्याने स्पेनच्या बुर्गोस बुर्पेललेट बीएच संघाच्या जॉर्जिओस बुग्लासला (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) मागे टाकले. तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बेल्जियमच्या टाटॅलेटो-आयसोरेक्स संघाचा तिमोथी ड्यूपॉन्ट (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) तिसऱ्या स्थानावर राहिला. मलेशियाच्या तेरेंगानू सायकलिंग टीमचा झेब कायफिन चौथ्या क्रमांकावर राहिला.
पहिल्या दोन टप्प्यांचा विजेता ल्यूक (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) या वेळी सहाव्या स्थानावर राहिला. मात्र, त्याने ‘बेस्ट संप्रंटर’ साठीची हिरवी जर्सी मिळवली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकूण क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखून ‘पिवळी जर्सी’ स्वतःकडेच ठेवली. तीन टप्प्यांनंतर ल्यूक एकूण ७ तास ३६ मिनिटे १० सेकंद वेळेसह पहिल्या स्थानावर आहे. थायलंडच्या रुजाई इन्शुरन्स विन्स्पेसच्या कार्टर अॅलन बेटल्सपेक्षा तो केवळ १४ सेकंदांनी पुढे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विजेत्या स्कॉटला सलाम ठोकला.
हेही वाचा : Australian Open 2026 : यानिक सिन्नरची तिसऱ्या फेरीत रॉयल एंट्री! नोवाक जोकोविचचा 399 वा विजय
“हा टप्पा अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त कठीण होता. सुरुवातीचे दोन चढण मार्ग आव्हानात्मक होते आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे कठीण जात होते; पण वळणदार रस्त्यांवर सायकल चालवताना मला खूप मजा आली.” कॅमेरून स्कॉट






