मुंबई – फार्मात असलेल्या विदर्भ कन्या छकुली सेलोकर, कल्याणी चीटे, कोकण कन्या पूर्वा आणि प्राप्ती किनारे आणि कोल्हापूरच्या मातीतील गुणवंत खेळाडू प्रज्ञा गायकवाड यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. या पाच कन्यांच्या सोनेरी यशाने महाराष्ट्र संघाला योगासनात पाचव्या सुवर्णपदकाची कमाई करता आली. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी आर्टिस्टिक सांगी गटात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र महिला संघाने फायनल मध्ये कुटील डावपेचाचे जाळे आखणाऱ्या यजमान गुजरात संघाला पिछाडीवर टाकले. १२८.८ गुणांच्या बळावर महाराष्ट्र महिला संघ सुवर्णपदक विजेता ठरला. त्यामुळे तीन गुणांच्या पिछाडीने यजमान गुजरातला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्या पाठोपाठ तामिळनाडू संघ कांस्यपदक विजेता ठरला.
आर्टिस्टिक सांघिक गटाच्या फायनल मध्ये स्पर्धेतील तीन वेळची रौप्यपदक विजेती छकुलीने संघाचे सर्वोत्तम नेतृत्व केले. तिच्या याच उल्लेखनीय कामगिरीला रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती यांनी सर्वोत्तम साथ दिली. त्याचबरोबर नागपूरची कल्याणी आणि कोल्हापूरची प्रज्ञा सोनेरी यशात मोलाचे योगदान देण्यात यशस्वी ठरल्या. त्यामुळे तीन गुणांची आघाडी घेत महाराष्ट्र महिला संघ सोनेरी यशाचा मानकरी ठरला. प्रशिक्षक श्वेता पाटील, व्यवस्थापक प्राजक्ता खवले, डान्स कोरिओग्राफर सोनाली मॅडम यांनी मोलाचे परिश्रम घेतले.