मुंबई : आज रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये ‘डब्ल्यूपीएल’ची अंतिम लढत रंगणार आहे. (women premier league) राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या भारतातील दोन प्रमुख शहरांच्या संघांना पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे ऐतिहासिक जेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं पहिल्या महिला प्रीमियर लीगचा विजेतेपद कोण पटकवणार? आज पहिल्यांदाच पहिल्या महिला प्रीमियर लीगला विजेता कोण मिळणार? याची उत्सुकता क्रिकेटप्रेमीना लागली आहे. मुंबईतील मैदानावर हे दोन्ही संघ सायंकाळी ७.३० वाजेपासून समोरासमोर असतील. दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर लीगमध्ये आपले वर्चस्व गाजवत फायनलचा पल्ला गाठला. दिल्ली संघाने गुणतालिकेमध्ये सर्वाधिक १२ गुणांची कमाई करत थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारली. त्यामुळं आज मुंबई दिल्ली काबिज करणार का? की दिल्ली मुंबईला चीतपट करणार याकड़े क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. (Women Premier League 2023 final match in mumbai on sunday)
क्रिकेटप्रेमीचा तुफान प्रतिसाद…
दरम्यान, इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच भारतात ‘डब्ल्यूपीएल’चा प्रयोग करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी ठरला असून स्पर्धेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महिला प्रीमियर लीगला क्रिकेटप्रेमीनी तुफान प्रतिसाद दिला आहे, त्यामुळं पुढील वर्षी देखील महिला प्रीमियर लीग आयोजित केली जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघानी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. आज होणाऱ्या अंतिम लढतीत दोनही संघ दर्जेदार खेळ करतील अशी चाहत्यांचा नक्कीच आशा असेल.
१० कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव…
फायनलमधील प्रवेशासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने यूपी वॉरियर्जचा पराभव केला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवून देणारी यशस्वी कर्णधार लॅनिंगच्या नेतृत्वात दिल्ली संघ किताबासाठी सज्ज झाला आहे. तसेच उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाच्या मारिजानेचा दिल्ली टीममध्ये समावेश आहे. त्यामुळं आजची ‘काँटे की टक्कर’ दोन्ही संघात होणार आहे. पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगच्या विजेत्यांवर आता १० कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणारा संघ ६ कोटींच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. तसेच उपविजेत्या संघाचा ३ कोटींचे बक्षीस देऊन गौरव केला जाईल. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या यूपी वॉरियर्ज संघाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले.