प्रतिका रावल(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs NZ W, Women’s World Cup 2025 : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघात लढत सुरू आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ४८ ओव्हरपर्यंत २ विकेट्स गमावून ३२९ धावा उभारल्या आहेत. या सामन्यात भारतीय सलामी जोडी प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या जोडीने जोरदार कामगिरी करून भारतीय संघाला पहिल्या विकेट्ससाठी २१२ धावा जोडून दिल्या. दोघींनी आपापली शतकं पूर्ण केली. या दरम्यान भारतीय सलामीवीर प्रतीका रावलने तिच्या फलंदाजीने इतिहास रचला आहे. तिने पूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी मर्यादित असलेली कामगिरी करून दाखवली आहे. नवी मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रतीकाने हा विक्रम रचला आहे. तिने १३४ चेंडूंचा सामना करत १२२ धावा केल्या आहेत.
गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना प्रतीका रावलने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत १००० धावांचा टप्पा गाठला आहे. तिने सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी तिने २२ एकदिवसीय सामन्यात ९८८ धावा केल्या होत्या, त्यामुळे या सामन्यात ती हा टप्पा ओलांडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रतिकाने तिच्या २३ व्या सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत हा पराक्रम केला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा एक जागतिक विक्रम असून जो काही मोजक्याच फलंदाजांकडून साध्य झाला आहे.
हेही वाचा : IND vs AUS 2nd ODI : अॅडलेडमध्ये गिल नापास; भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय
प्रतिका रावलने ही कामगिरी करून ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. रीलरने देखील फक्त २३ एकदिवसीय डावात १००० धावा पूर्ण करण्याची किमया साधली होती. ऑस्ट्रेलियन फलंदाज निकोल बोल्टन आणि मेग लॅनिंग यांनी २५ डावात ही कामगिरी करून दाखवली आहे. प्रतिका रावलने आता या यादीत तिची जागा घेण्याची कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकेही ठोकली आहेत.
प्रतिका रावलने फक्त २३ डावात १००० एकदिवसीय धावांचा टप्पा गाठून माजी भारतीय कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला आहे. मिताली राजने २९ डावात या टप्प्याला गवसणी घातली होती. परंतु, प्रतिकाने तिच्यापेक्षा खूप लवकर आणि कमी डावात हा टप्पा गाठला. प्रतिका रावलच्या कामगिरीने महिला क्रिकेटमध्ये भारताची चमक आणखीच वाढण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा : IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं






