Yashasvi Health Update : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली होती. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत यशस्वीने अंदाजे २ किलो वजन कमी झाले आहे आणि डॉक्टरांनी त्याला ७ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान हा सर्व प्रकार समोर आला आहे. जेव्हा हरियाणाविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याची प्रकृती अचानक बिघडली होती, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.
हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर
यशस्वीला सामन्यादरम्यान खूप अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. सुरुवातीला पोटात सूज आल्याचे निदान झाले, परंतु पुढील तपासणीत खरे कारण समोर आले आहे.
सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंडमध्ये यशस्वीला गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा त्रास असल्याचे उघड झाले आहे. हे सहसा अन्न विषबाधेमुळे होते आणि त्यामुळे पोटदुखी, अशक्तपणा आणि वजन देखील कमी होते. त्याच्या बिघडत्या तब्येतीमुळे, यशस्वीला काही काळ रुग्णालयात राहावे लागेल. तथापि, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याची प्रकृती आता बरी असल्याची माहिती आहे.
यशस्वी जयस्वालला आता रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे. तो मुंबईत परतला असून त्याला पुढील काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि तो पुढील काही दिवस क्रिकेटपासून लांब राहणार आहे. एका सूत्राने सांगितले की, “हा अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असून पुण्यातील हॉटेलमध्ये त्याने काहीतरी खाल्ले असण्याची शक्यता असून त्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांत त्याचे २ किलो वजन कमी झाले असून डॉक्टरांनी त्याला ७ ते १० दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.”
असे बोलले जात आहे की, यशस्वी पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान एक आठवडा तरी लागणार आहे. त्यामुळे, तो विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनाची घाई करण्याच्या तयारीत नाही.
बीसीसीआय यशस्वी जयस्वालच्या प्रकृतीवर देखील बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिका खेळणार असून ज्यामध्ये यशस्वी एकदिवसीय संघाचा भाग असणार आहे.






