शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स
भारतातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडवण्याचा उद्देश असलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे, ज्याचे नाव भारत बोधन एआय स्टॅक असे ठेवले गेले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या विषयांचे ऑडिओ आणि व्हिडिओ लेक्चर्स मोबाईलवर मिळतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत, शिक्षकांच्या आवाजात आणि शैलीत व्याख्याने ऐकता येतील. (फोटो सौजन्य – AI Created)
सर्व शिक्षण संबंधित मोबाइल अॅप्स हे ‘भारत बोधन’ एआय स्टॅकवर आधारित असतील, ज्याप्रमाणे यूपीआय अॅप्स काम करतात. यामुळे शिक्षण अत्यंत परस्परसंवादी होईल, जिथे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न विचारता येतील आणि त्वरित उत्तरे मिळू शकतील. हे प्लॅटफॉर्म कस्टमाइज्ड आहे, ज्यामुळे विद्याथ्यांच्या प्रश्नांनुसार लेक्चर्स तयार केले जातील. भारत बोधन एआय स्टॅकला अधिक सुसंगत करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एक ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह’ आयोजित केले जाईल. या उपक्रमात शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा होईल.
आयआयटी मद्रासमध्ये ‘आयआयटी मद्रास बोधन एआय फाउंडेशन’ स्थापन करण्यात आले आहे, जे स्केलेबल एआय सोल्यूशन्स विकसित करण्याचे कार्य करणार आहे. यामुळे शिक्षणाच्या पातळीवर आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये देखील मोठा बदल होईल. शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी याबाबत सांगितले की, यापुढे एआय द्वारे विविध भाषामध्ये शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थी अधिकाधिक लाभ घेऊ शकतील.






