राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात (फोटो सौजन्य-Gemini)
या खड्यामुळे महिनाभरात सहा त्यात एक महिला जायबंदी झाली आहे. दुचाकीवरून पडलेल्या जखमींना स्थानिक रहिवासी बऱ्याचदा उचलून अॅम्बुलन्स मध्ये उपचारासाठी रवाना करतात. स्थानिकांना हा त्रास नेहमीचाच झाला असून, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष स्थानिकांच्या जीवावर उठले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक सिराज शेख यांनी दिली.
दोन्ही बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकांना या रस्त्याच्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने त्यात दुचाकी आदळून अपघात होत आहेत. दुचाकीवरून उडून चालक किंवा पाठीमागे बसलेला प्रवासी रस्त्यावर पडून जखमी होण्याच्या गेल्या महिन्याभरात सहा ते सात घटना घडल्या आहेत. चारचाकी वाहने आदळूनही त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक रहिवासी धावपळ करून जखमींना वाचवण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम विभागाला या संदर्भात अवगत करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभाग प्रवाशांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात यावा यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेऊन त्यावर चारही बाजूने पांढऱ्या रंगाचा पट्टा मारला आहे. मात्र, दूरवरून तो लक्षात येत नसल्याने अपघात नित्याचेच झाले आहेत.
तसेच तारवालानगर ते अमृतधाम लिंक रोडवर पावसाळा सुरू होण्याअगोदरपासून खड्डे पडलेले आहेत . मात्र मनपा प्रशासनाने याबाबत कुठलेही गांभीर्य दाखविले नाही, परिणामी एका सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी गेला, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.






