iPhone 17 Series: iPhone Air च्या कॅमेऱ्यामध्ये गडबड, क्लिक केलेले फोटो पाहून भडकले युजर्स! कंपनीने मान्य केली चूक
iPhone 17 सीरीजची विक्री सुरु झाली आहे. कंपनीने ही नवीन आयफोन सिरीज 9 सप्टेंबर रोजी लाँच केली होती. त्यानंतर 12 सप्टेंबरपासून या सिरीजमधील मॉडेल्सची प्री बुकींग सुरु करण्यात आली. यानंतर 19 सप्टेंबरपासून या नव्या आयफोन 17 सिरीजची विक्री सुरु झाली आहे. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी काल ग्राहकांनी अॅपल स्टोअर बाहेर मोठी गर्दी केली होती. कंपनीने यावेळी त्यांच्या आयफोन सिरीजमध्ये काही बदल केले आहेत. मॉडेलमधील कॅमेरा डिझाईनमध्ये देखील काही बदल करण्यात आला आहे. तसेच यावेळी कंपनीने त्यांच्या आयफोन सिरीजमध्ये नवीन iPhone Air या मॉडेलचा समावेश केला आहे.
iPhone Air हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात पातळ मॉडेल आहे. काल ज्यांनी नवीन आयफोन 17 सिरीज मॉडेल्स खरेदी केले, त्यांनी आता या मॉडेल्सचे फर्स्ट इंप्रेशन शेयर करण्यास सुरुवात केली आहे. इतर मॉडेल्सशी तुलना करता युजर्सनी iPhone Air बाबत काही तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सनी सांगितलं आहे की, नवीन आयफोन सिरीजमध्ये कॅमेऱ्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सर्वात जास्त iPhone Air मध्ये आढळली. कंपनीने देखील युजर्सच्या या तक्रारीची पुष्टी केली आहे. (फोटो सौजन्य – X)
एक टेक जर्नलिस्ट iPhone Air बाबत रिव्यू शेअर करत होता. यावेळी जेव्हा त्याने या पातळ आयफोनच्या कॅमेऱ्याने काही फोटो क्लिक केले तेव्हा iPhone Air च्या कॅमेऱ्यामधील बगबद्दल माहिती मिळाली. कॉन्सर्ट फोटो क्लिक करताना जर्नलिस्टने पाहिलं की, 10 पैकी एका फोटोचा काही भाग काळा दिसत आहे, तसेच यामध्ये काही विचित्र डाग देखील पहायला मिळत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये सफेद रेषा दिसत आहेत. तथापि, हे फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच घडते. जर्नलिस्टने सांगितले की एलईडी डिस्प्लेचे फोटो काढताना हा बग विशेषतः पहायला मिळत आहे.
जर्नलिस्टने शेअर केलेल्या रिव्ह्युनंतर अॅपलने देखील या बगची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हे विशिष्ट प्रकाशात घडते आहे. हा एक सॉफ्टवेअर बग आहे जो आता दुरुस्त करण्यात आला आहे. पुढील अपडेटमध्ये हे फिक्स रोल आउट केलं जाणार आहे. मात्र या आयफोनसाठी पुढील अपडेट कधी रोलआऊट केलं जाणार आहे, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.
कंपनीने नुकतीच त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने प्लस मॉडेलऐवजी आईफोन एयर लाँच केला आहे. या पातळ आयफोनची जाडी केवळ 5.6mm आहे. यात प्रोमोशन तंत्रज्ञानासह 6.5 इंचाची स्क्रीन आहे. यात सिंगल 48MP रिअर कॅमेरा आणि 18MP फ्रंट कॅमेरा आहे. A19 Pro चिपसेटद्वारे समर्थित, या फोनची किंमत भारतात 1,19,900 रुपयांपासून सुरू होते.