लवकरच येणार स्वदेशी वेब ब्राउझर! भारतीय युजर्सचा डेटा राहणार अधिक सुरक्षित, डिजिटल सेफ्टी आणि प्रायव्हसीही होणार मजबूत
डिजीटल इंडियाच्या दिशेने सध्या आपला भारत देश वाटचाल करत आहे. त्यामुळे भारतात अनेक नवीन बदल केले जात आहेत. असाच एक मोठा बदल आता होणार आहे. हा बदल म्हणजे भारतीयांसाठी मोठी प्रगती आहे. कारण आता भारतात स्वदेशी सुरक्षित वेब ब्राउझर विकसित केला जाणार आहे. हा वेब ब्राउझर भारतीयांसाठी विकसित केला जाणार आहे. हा वेब ब्राऊझर सुरक्षित असणार आहे.
डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता भारताने स्वदेशी सुरक्षित वेब ब्राउझर विकसित करण्याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू केला आहे. हे वेब ब्राउझर युजर्सना सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट ब्राउझिंग अनुभव देईल. हा प्रकल्प सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) बेंगळुरूने सुरू केला आहे. (फोटो सौजन्य – X)
हे भारतीय वेब ब्राउझर iOS, Android आणि Windows सारख्या सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
उच्च-स्तरीय डेटा सुरक्षा: हे ब्राउझर भारतातच युजर्सचा डेटा संग्रहित करेल, ज्यामुळे संवेदनशील माहितीवर नियंत्रण राहील. या निर्णयामुळे भारतीयांचा डेटा दुसऱ्या देशात जाणार नाही.
सीसीए इंडिया रूट सर्टिफिकेट आणि डिजिटल साइनिंग: ब्राउझरमध्ये एक समर्पित ट्रस्ट स्टोअर असेल, जे डिजिटल साइनिंग आणि ऑथेंटिकेशनला सपोर्ट करणार आहे.
मुलांसाठी अनुकूल ब्राउझिंग आणि पालक नियंत्रणे: मुलांची सुरक्षितता आणि पालकांच्या चिंता लक्षात घेऊन, त्यात काही विशेष ब्राउझिंग वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
वेब 3 सपोर्ट आणि आधुनिक ब्राउझर क्षमता: हे युजर्सना प्रगत वेब तंत्रज्ञानासह सुरक्षित आणि जलद इंटरनेट अनुभव देईल.
स्वदेशी ब्राउझर विकसित करण्यासाठी इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंज (IWBDC) कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. देशभरातील स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील नेते यात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम तीन टप्प्यात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये आइडिया, प्रोटोटाइप आणि प्रोडक्टाइजेशन चॅलेंज यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाता 434 हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी 8 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या 8 संघांची घोषणा केली आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल संघाचे कौतुकही केले. या दरम्यान, झोहो कॉर्पोरेशनने 1 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आणि टीम पिंग (स्टार्टअप) ला प्रथम उपविजेते म्हणून 75 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आणि टीम अजना ला द्वितीय उपविजेते म्हणून 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याच वेळी, मल्टी-प्लॅटफॉर्म ब्राउझर डिझाइनसाठी जिओ विश्वकर्माला विशेष उल्लेख मिळाला.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्वदेशी वेब ब्राउझर हे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी स्टार्टअप्स आणि उद्योगांना भारतीय डिजिटल सोल्यूशन्ससाठी सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रेरित केले.