Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा? काय होणार याचे परिणाम?
चॅटजीपीटी 40 ने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कारण चॅटजीपीटीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या Ghibli ईमेजने सर्वांना वेड लावला आहे. सर्व सोशल मीडियांवर Ghibli ईमेजने धुमाकूळ घातला आहे. लोकं स्वत:ची, त्याच्या मित्र – मैत्रिणींची, कुटूंबाची Ghibli ईमेज तयार करत आहेत. Ghibli ईमेज तयार करण्यासाठी चॅटजीपीटीसह अनेक AI चा वापर केला जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Ghibli ईमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो AI सोबत शेअर करावा लागतो. पण AI आपल्या फोटोचा गैरवापर करत आहे का?
मागील काही घटनांचा विचार केला तर अशी देखील प्रकरण समोर आली आहेत, जिथे लोकांच्या फोटोंवरून त्यांची ओळख चोरून ती विकण्यात आली आहे. त्यामुळे सध्या Ghibli ईमेजने लोकांना कितीही वेड लावलं असलं तरी त्याचा वापर किती योग्य आणि सुरक्षित याबाबत शंकाच आहे. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो किंवा एक्स, लोक त्यांचे Ghibli ईमेज सर्वत्र शेअर करत आहेत. लोक Ghibli ईमेज तयार करण्यासाठी केवळ AI सोबत स्वतःचे फोटो शेअर करत नाहीत तर ते त्यांच्या कुटुंबांचे, अगदी लहान मुलांचेही फोटो शेअर करत आहेत. पण लोकांना माहिती नाही की, असे करून ते केवळ त्यांच्या फोटोंचा डेटा AI कंपन्यांसोबत शेअर करत नाहीत तर नकळत त्यांचे चेहऱ्याची ओळख देखील त्यांना देत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Ghibli ईमेज तयार करण्यासाठी AI सोबत फोटो शेअर केला म्हणजे तुमची ओळख चोरली जाते, असं नाही. आपण वेगवेगळ्या कामासांठी आपला चेहरा आणि आपले फोटो AI सोबत शेअर करतो. पण या सर्व गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्याची ओळख चोरली जात आहे का, या सर्व गोष्टी किती सुरक्षित आहेत, हे तपासून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण Ghibli मुळे आपण आपली चेहऱ्याची ओळख AI कंपन्यांना देत आहोत. ही गोष्ट फार साधी वाटत असेल, पण त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. तुमच्या चेहऱ्याची ओळख चोरीला जाणं हे पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबरपेक्षा जास्त धोकादायक आहे कारण तुम्ही ते बदलू शकता पण जर तुमचा चेहरा चोरीला गेला तर तुम्ही तो बदलू शकत नाही.
क्लियरव्ह्यू AI वाद हा असाच एक प्रसंग होता. खरं तर, क्लिअरव्ह्यू AI वर सोशल मीडिया, न्यूज साइट्स आणि सार्वजनिक रेकॉर्डमधून परवानगीशिवाय 3 अब्ज फोटो चोरून आणि ते पोलीस आणि खाजगी कंपन्यांना विकून डेटाबेस तयार केल्याचा आरोप होता. याव्यतिरिक्त, मे 2024 मध्ये, ऑस्ट्रेलियन कंपनी आउटाबॉक्सचा डेटा लीक झाला ज्यामध्ये 1.05 दशलक्ष लोकांचे चेहरे स्कॅन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पत्ते चोरीला गेले. हा डेटा ‘हॅव्ह आय बीन आउटबॉक्स्ड’ नावाच्या साइटवर पोस्ट करण्यात आला होता. पीडितांनी चुकीची ओळख, छळ आणि ओळख चोरीची तक्रार केली. एकदा चोरीला गेल्यावर, तुमचा डेटा काळ्या बाजारात विकला जातो, ज्यामुळे सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड किंवा डीपफेक तयार करणे यासारखे घोटाळे होतात.
स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, 2025 मध्ये फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी (FRT) ची बाजारपेठ 5.73 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि 2031 पर्यंत 16.79 टक्के CAGR सह 14.55 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मेटा आणि गुगल सारख्या कंपन्यांवर युजर्सचे फोटो वापरून त्यांच्या AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्याचा आरोप आहे, असं देखील सांगण्यात आलं होतं. PimEyes सारख्या साइट्स कोणालाही त्यांच्या फोटोवरून ऑनलाइन शोधण्याची परवानगी देतात. यामुळे ओळख चोरीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
हे सर्व धोके टाळण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे कोणत्याही टूलचा वापर करताना काळजी घेणं. आपण AI सोबत फोटो शेअर करतोय पण यामुळे आपल्याला भविष्यात कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही ना याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमची एक चूक तुमच्या भविष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर उच्च-रिझोल्यूशनचे फोटो अपलोड करणे टाळा. फेस अनलॉकऐवजी पिन किंवा पासवर्ड वापरा. याशिवाय, तुमचा बायोमेट्रिक डेटा कसा वापरला जात आहे हे सांगण्यासाठी सरकार आणि कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे. यामध्ये सरकारचे महत्त्वाचे काम म्हणजे फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाच्या बेकायदेशीर वापरावर बंदी घालणं.