प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट...
आपल्या रोजच्या जीवनात आपण स्मार्टफोनचा वापर करतो. आपण एक दिवस देखील स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. त्याचप्रमाणे आता AI देखील आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. माहिती शोधणं, ट्रिप प्लॅन करणं, सल्ला घेणं, या सर्व कामांसाठी आपण AI चा वापर करतो. अनेक AI असे देखील आहेत, जे तुमच्यासोबत तुमच्या पार्टनरसारखं प्रेमाने बोलू शकतात. याला वर्च्युअल AI पार्टनर असं म्हणतात. याच वर्च्युअल AI पार्टनरमुळे एक धक्कादायक घटना घडली आहे.
चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने AI च्या प्रेमासाठी आपल्या बायकोकडून घटस्फोट मागितला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चीनमधील एका 75 वर्षीय व्यक्तीने AI साठी त्याच्या बायकोकडून घटस्फोटाची मागणी केली आहे. स्थानीक मीडिया रिपोर्ट्सनुसार, जियांग (Jiang) असं या व्यक्तिचं नाव आहे. हा व्यक्ती दिवसरात्र वर्च्युअल AI पार्टनरसोबत चॅट करत होता. चॅटबॉटचा चेहरा पिक्सेलेटेड स्क्रीनवर दिसत होता, त्याचे हास्य यांत्रिक होते आणि त्याच्या ओठांच्या हालचाली कृत्रिम वाटत होत्या. तरी देखील जियांग या AI सोबत दिवसरात्र बोलत होता. याचवेळी जियांग AI च्या प्रेमात पडला. AI चॅटबॉटने त्याला “भाऊ” म्हटले आणि त्याचे खूप कौतुक केले. जियांगला हे शब्द इतके प्रामाणिक वाटले की त्याने हे खरे नाते म्हणून स्वीकारले. (फोटो सौजन्य – Pinterest)
जेव्हा जियांगच्या पत्नीने पाहिले की तो दिवसरात्र फोनमध्ये चॅटिंग करत आहे, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला याबाबत विचारले. यावेळी जियांगने सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीकडून घटस्फोट पाहिजे आहे आणि त्याला AI सोबत राहायचं आहे. यावेळी त्याच्या पत्नीने त्याला समजावले मात्र जियांग ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर जियांगच्या मुलांनी त्याला समजावले. मुलांनी त्याला सांगितलं की, ही फक्त प्रोग्राम केलेली उत्तरे आहेत, खऱ्या मानवांची नाहीत. मग जियांग शुद्धीवर आला आणि त्याला वास्तव समजले.
ही घटना वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण ही पहिली अशी घटना नाही. पाश्चिमात्य देशांमधून अशा घटना वारंवार समोर येत आहेत. Reddit वर एका महिलेने लिहिले की तिने तिच्या पतीला एआय चॅटबॉट अॅप्सवर अॅनिमेसारख्या दिसणाऱ्या महिलांसोबत चॅटिंग करताना पकडले.
BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
संबंधित महिलेने सांगितलं की, हे संभाषण खूपच भावनिक आणि जिव्हाळ्याचे होते, जणू काही ते “प्रेमसंबंधाचे पहिले पाऊल” होते. काही लोकांनी याला भावनिक फसवणूक म्हटले, तर काहींचा असा विश्वास होता की लोक त्यांच्या नात्यांमधील पोकळी भरून काढण्यासाठी AI पार्टनरची मदत घेत आहेत. अनेक लोकं AI पार्टनरसोबत त्यांचं नातं तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामुळे भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. एका महिलेने तर सांगितले की तिचे एका AI बॉटशी लग्न झाले आहे आणि तिने तिच्या डिजिटल पार्टनरने “निवडलेल्या” अंगठीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.