Meta आणि OpenAI भारताच्या 'या' कंपनीसोबत करणार हातमिळवणी! नवीन AI पार्टनरशिप युजर्ससाठी ठरणार फायदेशीर की वाढवणार टेंशन?
भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीसोबत भागिदारी करण्यासाठी दोन मोठ्या परदेशी कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. या कंपन्या म्हणजे Meta आणि OpenAI. होय, अमेरिकेच्या दिग्गज कंपन्या Meta आणि OpenAI रिलायन्स इंडस्ट्रीसोबत भागिदारी करणार आहेत. यासाठी त्यांनी एक ऑफर देखील आणली आहे, या ऑफरबाबत सध्या चर्चा केली जात आहे. ही भागिदारी भारतातील युजर्ससाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. भारतात AI चा विस्तार करण्यासाठी ही भागिदारी केली जाणार असल्याचं, सांगितलं जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओ आणि OpenAI यांच्यात भागीदारीबाबत चर्चा करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे आणि OpenAI ही AI चॅटबॉट चॅटजीपीटी तयार करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आता या दोन्ही दिग्गज कंपन्यांमधील भागिदारीबाबत चर्चा सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की OpenAI ने त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चॅटजीपीटीचे सबस्क्रिप्शन प्लॅन स्वस्त करण्याबाबत चर्चा केली आहे. तथापि, कंपनीने रिलायन्सशी झालेल्या चर्चेदरम्यान याबाबत भाष्य केलं असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. रिलायन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी OpenAI चे मॉडेल्स त्यांच्या एंटरप्राइझ ग्राहकांना एपीआयद्वारे विकण्यावर चर्चा केली होती. याशिवाय, रिलायन्सने भारतात OpenAI मॉडेल्स होस्ट करण्याची आणि चालवण्याची ऑफर देखील दिली आहे जेणेकरून स्थानिक युजर्सचा डेटा भारतातच साठवता येईल आणि हा डेटा अधिक सुरक्षित राहू शकतो. मात्र ही भागिदारी कधी केली जाणार आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे, याबाबत अद्याप दोन्ही कंपन्यांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही.
OpenAI व्यतिरिक्त, रिलायन्सने जामनगरमधील कंपनीच्या आगामी डेटा सेंटरमधून त्यांचे AI मॉडेल्स चालविण्यासाठी मेटाशी देखील चर्चा केली आहे. रिलायन्स गुजरातमधील जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे AI डेटा सेंटर बांधणार आहे. या केंद्राची एकूण क्षमता 3 गिगावॅट असेल आणि जगात त्याची कोणतीही स्पर्धा नसेल. सध्या, बहुतेक कार्यरत डेटा सेंटर्स अमेरिकेत आहेत आणि त्यापैकी बहुतेकांची क्षमता एक गिगावॅटपेक्षा कमी आहे. मात्र आता भारतात तयार केल्या जाणाऱ्या या केंद्रांची क्षमता जास्त असणार आहे. या प्रकल्पासाठी रिलायन्सने NVIDIA सोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये वापरलेला AI सेमीकंडक्टर NVIDIA कडून घेतला जाईल. मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत परिपत्रक जारी केलं नाही.
डेटा सेंटर चालविण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेक तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जर आपण गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या डेटा सेंटरबद्दल बोललो तर त्याच्या बहुतेक गरजा हरित ऊर्जेद्वारे पूर्ण केल्या जातील. रिलायन्स या क्षेत्रात सौरऊर्जा, पवनचक्क्या आणि हरित हायड्रोजन प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे.