ट्रेनमध्ये चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी रेल्वेने सुरु केलं नवीन App, अशा पद्धतीने नोंदवा तुमची तक्रार
भारतात प्रवास करण्यासाठी ट्रेनचा सर्वात जास्त वापर केला जातो. ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं. जर एक दिवस ट्रेन बंद असेल तर लाखो लोकांचे हाल होतात. कामावर जाण्यासाठी असो किंवा गावी जाण्यासाठी बहुतेक लोकं ट्रेनचाच पर्याय निवडतात. ट्रेनमुळे तुम्ही अगदी कमी किंमतीत आणि सर्वात जलद कुठेही पोहोचू शकता. जवळपास सर्वचजण ट्रेनने प्रवास करत असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होते. अक्षरश: लोकांना बाहेर लटकून प्रवास करावा लागतो.
ट्रेनमधील याच गर्दीचा फायदा चोरांकडून घेतला जातो. ट्रेनमध्ये मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. गर्दी असल्यामुळे आपला मोबाईल चोरीला गेला आहे, हे अनेकांना समजत देखील नाही. जेव्हा आपल्याला मोबाईल चोरीबद्दल समजतं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि या सर्वांमुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. याच सर्व गोष्टींचा विचार करून आता रेल्वेने एक मोठं पाऊल उचललं आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रेल्वेने एक नवीन अॅप सुरु केला आहे, ज्याद्वारे प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्यास तो सहजपणे ट्रॅक करता येतो. खरं तर, दूरसंचार विभाग (DoT) आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांनी संयुक्तपणे एक नवीन पाऊल उचलले आहे ज्यामुळे मोबाईलचा ट्रेसिंग, ब्लॉकिंग आणि रिकव्हरी आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. रेल्वेने सुरु केलेली ही सुविधा ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसाठी फायदेशीर ठरणार आहे.
दूरसंचार विभागाचे ‘संचार साथी’ पोर्टल आता भारतीय रेल्वेच्या ‘रेल मदत’ अॅपशी एकत्रित करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे, प्रवासी त्यांच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलबद्दलची तक्रार थेट ‘रेल मदत’ अॅपवर नोंदवू शकतात. ही तक्रार आपोआप ‘संचार साथी’ पोर्टलवर पोहोचेल जिथून मोबाईल ब्लॉक केला जाईल जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये आणि त्याचे ट्रॅकिंग सुरू करता येईल.
यात्रीगण कृपया ध्यान दे!
अब आप Railway Station या Train में अपने गुम/चोरी हुए Mobile Phone को RPF और Sanchar Saathi की मदद से Block और Trace कर सकते है pic.twitter.com/c3j6ETbV01
— DoT India (@DoT_India) April 3, 2025
या पोर्टलवर अनेक सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे मोबाईल फोन शोधणे आणखी सोपे होते.
ब्लॉकिंग सुविधा: पोर्टलवर तक्रार करून कोणीही त्याचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करू शकतो.
ट्रेसिंग आणि रिकव्हरी: मोबाईल ट्रेसिंग आणि रिकव्हरी याबद्दल पोलिस आणि आरपीएफला माहिती दिली जाते.
सायबर गुन्ह्यांचा अहवाल देणे: हे पोर्टल दूरसंचार संसाधनांचा गैरवापर, सायबर फसवणूक आणि इतर डिजिटल गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देखील प्रदान करते.
प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही या अॅपवर सहजपणे तक्रार दाखल करू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला Rail Madad अॅप डाउनलोड करावे लागेल आणि त्यात हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवावी लागेल.
यानंतर तक्रार आपोआप ‘संचार साथी’ पोर्टलवर पोहोचेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही www.sancharsaathi.gov.in वर थेट भेट देऊन तुमचा मोबाईल ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता .