Upcoming iPhone: 2025 मध्ये लाँच होणार Apple चे 5 नवे iPhone, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
टेकजायंट कंपनी अॅपलने 2024 च्या सप्टेंबर महिन्यात iPhone 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीजला युजर्सचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता यंदा 2025 मध्ये कंपनी त्यांचे 5 नवीन आयफोन लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. कंपनी यंदा मार्चपासून, नवीन Macs, iPads आणि iPhones सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदा कोणते आयफोन लाँच होणार आणि त्यांची किंमत काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, 2025 मध्ये एकूण 5 नवीन आयफोन मॉडेल्स लाँच केले जातील, जे पूर्वीपेक्षा अधिक अपग्रेड आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज असतील. त्यांची किंमत काय असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यातील एक आयफोन अतिशय स्वस्त किंमतीत लाँच केला जाणार आहे. अॅपलने घोषणा केली आहे की, ते त्यांचा स्वस्त आयफोन लवकरच लाँच करणार आहेत. त्यामुळे हा आयफोन 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी आशा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
2025 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये iPhone SE 4, आयफोन 17, आयफोन स्लिम किंवा एअर, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश असणार आहे. या आयफोन्सचे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स शेअर करण्यात आले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
2025 मध्ये, अॅपल आपल्या ग्राहकांना iPhone SE 4 सह एक मोठे सरप्राईज देणार आहे, ज्याला iPhone 16E म्हणून देखील ओळखले जाऊ शकते. आतापर्यंत SE मॉडेल्सनी ग्राहकांच्या मनावर अपेक्षित छाप सोडली नव्हती, परंतु यावेळी Apple नवीन आणि आधुनिक डिझाइन लाँच करणार आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन असणार आहे. हा बजेट आयफोन फेस आयडीला सपोर्ट करेल आणि त्यात अॅपलच्या नवीन एआय तंत्रज्ञानाचाही समावेश असेल. याशिवाय, यात सिंगल रियर कॅमेरा असेल आणि त्याची किंमत जवळपास 600 डॉलर म्हणजेच सुमारे 48,600 रुपये असण्याची शक्यता आहे. ज्या वापरकर्त्यांना कमी किंमतीत स्मार्ट फीचर्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा आयफोन उत्तम पर्याय ठरू शकतो.
iPhone 17 ची लाँच डेट अद्याप शेअर करण्यात आली नसली तरी त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल चर्चा आधीच सुरु झाली आहे. लीकनुसार, आयफोन 17 चे बेस मॉडेल प्रोमोशन डिस्प्ले आणि हाय रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. याशिवाय, iPhone 17 च्या बेस मॉडेलमध्ये प्रो-लेव्हल चिपसेट आणि कॅमेरा अपग्रेड देखील समाविष्ट असणार आहेत. हे लीक खरे असल्यास, आयफोन 17 एक शक्तिशाली अपग्रेड असल्याचे सिद्ध होऊ शकते.
अॅपल आयफोन प्लस मॉडेल बंद करू शकते आणि नवीन आयफोन स्लिम किंवा एअर लाँच सादर करू शकते, जे उत्कृष्ट डिझाइनसह येऊ शकते. आयफोन स्लिम व्हेरिअंट 5.5 मिमी स्लिम बॉडी आणि सिंगल रियर कॅमेरासह येईल, ज्यामुळे तो अॅपलचा सर्वात स्लिम आयफोन ठरणार आहे. तथापि, बॅटरीचा आकार लहान असू शकतो. या स्टायलिश आणि प्रीमियम स्मार्टफोनची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
2025 मध्ये अॅपल iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे दोन फोन देखील लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. जे उत्तम अपग्रेडसह येऊ शकतात. नवीन डिस्प्ले तंत्रज्ञानासह, या फोनमध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा असू शकतो, तर कॅमेरा सिस्टममध्ये पेरिस्कोप लेन्ससारखे मोठे बदल देखील दिसू शकतात. या शक्तिशाली वैशिष्ट्यांसह, आयफोन 17 प्रो व्हेरिअंटची किंमत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते आणखी प्रीमियम आणि हाय-एंड डिव्हाइसेस बनू शकतात.