Chakan News: बड्या नेत्याने घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांना वेग
ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीमागील नेमका उद्देश काय, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Ajit pawar News)
अजित पवार यांचा वराळे येथील नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यातील जिजाई निवासस्थानी चर्चेसाठी बोलावून घेतले. या भेटीत भामा खोऱ्यातील रखडलेली रस्ते कामे, प्रमुख जिल्हा मार्गांचे रुंदीकरण, कुंडेश्वर घाट रस्त्याची सुधारणा, भामा–आसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “पालकमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून विकासकामांसाठी निधी देण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. आवश्यक ते सहकार्य निश्चितपणे केले जाईल,” असे आश्वासनदिल्याची प्राथमिक माहिती आहे.. दरम्यान, शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लढवावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Zilla Parishad Election 2026)
भामा खोऱ्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामांना निधी मिळाळा आणि आजही तो मिळतोय. पण स्थानिक आमदार विरोधी पक्षाचे असल्यामुळे निधी न मिळाल्याने महत्त्वाच्या रस्त्यांची कामे रखडली आहे. ती मार्गी लावावीत, अशी मागणी बुट्टे पाटील यांनी अजित पवारांकडे केली. ” मी काम कऱणारा माणूस असून विकास कामांना निधी देण्याचा अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या बजेटमधून निधी देण्याचे काम लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी बुट्टे पाटील यांना दिले. दरम्यान, यावेळी बुट्टे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढवावी, अशी मागणीही केली. त्यामुळेदेखील या भेटीला एक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका’; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान
शरद बुट्टे पाटील यांचे अजित पवार यांच्याशी १९९९ पासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीची संधी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून २०१४ पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपचे पदाधिकारी असतानाही विकासकामांमध्ये पवार यांचे सहकार्य कायम राहिले.
लोकसभा व विधानसभा प्रचारादरम्यान पवार यांनी सार्वजनिकपणे बुट्टे पाटील यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे नमूद केले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील व दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारातही बुट्टे पाटील सक्रिय होते. त्यामुळे त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दिलीप मोहिते पाटील यांनीही स्थानिक व काम करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन करत अप्रत्यक्षपणे बुट्टे पाटील यांना मदतीचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.






