Coldplay कॉन्सर्टला जाण्याचा विचार करताय? सेल्फी स्टिकसह या Gadget वर आहे बंदी! वाचा संपूर्ण लिस्ट
मुंबईत 18, 19 आणि 21 जानेवारीला कोल्डप्ले कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. या कॉन्सर्टसाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे, कारण तिकीटांची विक्री जोरदार झालेली आहे. यापूर्वी, तिकिट एग्रीगेटर BookmyShow ने कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांकडे सरकारी आईडी प्रूफ असणे आवश्यक आहे.
याशिवाय त्यांना रिस्टबँडही दिले जातील, जे तिकीट म्हणून काम करतील. कोल्डप्ले कॉन्सर्टची सुरक्षा लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक पातळ्यांवर सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये काही गॅझेट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही देखील कोल्डप्ले कॉन्सर्टला जाण्याचा विचार करत असाल तर यादीमध्ये देण्यात आलेले गॅझेट्स तुमच्याकडे नाहीत ना, याची खात्री करून घ्या. (फोटो सौजन्य – pinterest)
हा कॉन्सर्ट यशस्वी आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. कॉन्सर्टमध्ये सहभागी होणारे लोक पॉकेट लेसर, पेन लेझर, अनधिकृत ड्रोन, ई-सिगारेट, व्हेप्स, मोनोपॉड्स, डिटेचेबल झूम लेन्स, स्टँड, ट्रायपॉड स्टँड, सेल्फी स्टिक, लॅपटॉप, टॅब्लेट, पॉवर बँक, मेगा फोन आणि रेकॉर्डिंग सारखे गॅझेट्स आपल्यासोबत नेऊ शकणार नाही. या उपकरणांशिवाय टेंट, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, कोणत्याही प्रकारची बाटली, फोल्ड करण्यायोग्य खुर्ची, कोणत्याही प्रकारची छत्री, अंडी, मार्कर, पेन, तंबाखूजन्य पदार्थ, औषधे, खाद्यपदार्थ, अल्कोहोल, दुर्गंधीनाशक, सनस्क्रीन, ब्लेड सारख्या वस्तू , खेळणी आणि हॉर्न इत्यादी देखील आत घेऊन जाऊ शकत नाही.
ब्लॅक मार्केटिंगच्या समस्येला तोंड देण्यासाठी BookMyShow ने बनावट तिकिटांची विक्री करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणी बनावट तिकिटांची विक्री करताना पकडले तर तिकीट आणि रिस्टबँड जप्त केल्या जातीलच, शिवाय कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यातही दिले जाऊ शकते. त्यामुळे अशा बनवाट तिकीट विक्री करणाऱ्या लोकांपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.
कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांची क्रेझ लोकांना वेड लावत आहे. जवळपास 1.3 कोटी लोकांनी तिकिट खरेदी करण्यासाठी BookMyShow मध्ये लॉग इन केले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॉन्सर्टची 1.5 कोटी तिकिटे उपलब्ध होती आणि अवघ्या 30 मिनिटांत सर्व तिकिटे विकली गेली. या तिकिटांची किंमत 2,000 रुपयांपासून 35,000 रुपयांपर्यंत होती. मात्र, काही काळानंतर काही रिसेल प्लॅटफॉर्मने ही तिकिटे 10 लाख रुपयांपर्यंत विकली आहेत.
लोकप्रिय ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेचा कॉन्सर्ट मुंबईत होणार आहे. 18, 19 आणि 21 जानेवारीला नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर ही मैफल रंगणार आहे. या कॉन्सर्टसाठी कोल्डप्ले बँड मुंबईत पोहोचला आहे. आपल्या ‘म्युझिक ऑफ द स्पेअर्स वर्ल्ड टूर’ दरम्यान, ब्रिटीश बँडने ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई परिसरात असलेल्या डीवाय पाटील स्टेडियमवर 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी तीन शो आयोजित केले असल्याची माहिती आहे.