अमेरिकेतील भीषण आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले आहे. ही आग लॉस एंजेलिस आणि हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली असून हजारो लोकांना यामुळे घरे सोडावी लागली आहेत. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 1100 हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. सांता मोनिका पर्वत आणि पॅसिफिक महासागर जवळ बांधलेल्या अनेक महागड्या घरांचेही मोठे नुकसान झाले. जंगलातील आगीचा एक भयानक व्हिडिओ देखील समोर आला आहे, जो स्थानिक रहिवाशाने फोनवर रेकॉर्ड केला आहे. कॅलिफोर्नियाच्या आकाशात काळा धूर दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे सर्व दृश्य कोणत्या चित्रपटातील सीनहुन कमी वाटत नाही.
अमेरिकेतील चित्रपटसृष्टीचे हृदयस्थान म्हणून ओळखले जाणारे दक्षिण कॅलिफोर्नियाचे चकाचक शहर जंगलातील आगीच्या धुराने आच्छादले आहे. आग आता हॉलिवूड हिल्सपर्यंत पोहोचली आहे, पासाडेना आणि पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये राहणाऱ्या अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी आगीत आपली घरे गमावली आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या लॉस एंजेलिसच्या व्हिडिओंमध्ये एक विनाशकारी दृश्य दिसत आहे, जे एखाद्या प्रलयासारखे दिसते. या व्हिडिओची पुष्टी करण्यात आलेली नसली तरी यात हा व्हिडिओ कॅलिफोर्नियाचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये युजरने तो हॉलिवूड हिल्सचा रहिवासी असल्याचा दावा केला आहे. व्हायरल क्लिपमध्ये आगीच्या ज्वाला आणि दाट धूर पाहून अनेकजण घाबरले आहेत, हे संपूर्ण दृश्य कोणत्या भयानक स्वप्नाहून कमी वाटत नाही.
कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन (कॅल फायर) नुसार, जोरदार वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरत आहे. मंगळवारपासून पॅलिसेड्समध्ये लागलेल्या या आगीने बुधवारपर्यंत 15,800 एकर जमीन जळून खाक झाली होती. गेटी व्हिला म्युझियम आणि एम्स हाऊस यासारख्या अनेक ऐतिहासिक स्थळांनाही धोका आहे. जोरदार वारा आणि कोरड्या झाडांमुळे आग विझवण्याचे काम अधिक कठीण झाले आहे. या आगीमुळे दक्षिण कॅलिफोर्नियामधील सहा काऊन्टीमध्ये वीज खंडित झाली असून, 4 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
Los Angeles looks apocalyptic.
— Tiffany Fong (@TiffanyFong_) January 8, 2025
दरम्यान हा भीषण घटनेचा व्हिडिओ @TiffanyFong_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘लॉस एंजेलिस ओशाळलेला दिसत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स करत या आगीवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे सर्व धक्कादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एका सायन्स फिक्शन चित्रपटाप्रमाणे वाटत आहे ज्याचे कोणतेच भविष्य नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.