(फोटो सौजन्य: Instagram)
आजकाल लग्नाचा सोहळा हा फक्त दोन व्यक्तींच्या मिलनाचे साधन राहिले नसून तो एक शोभेचा खेळ झाला आहे. लग्नसमारंभात अनेक शोबाजीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यातील एक म्हणजे सध्या जोडप्यांमध्ये ट्रेंड करत असलेलं प्री-वेडिंग शूट! लग्नाआधी नटून थटून आपल्या होणाऱ्या पार्टनरसोबत काढलेलं फोटोज किंवा व्हिडिओज म्हणजे प्री-वेडिंग शूट. आजकाल सर्वच जोडपे काहीतरी नवीन म्हणून अनोख्या अंदाजात हे शूट करु पाहतात. अशात असेच एक अनोखे आणि हटके शूट सध्या सोशल मिडियावर चांगलेच ट्रेंड करत आहे. शूटसाठी जोडप्याने निवडलेला मार्ग पाहून आता यूजर्स चांगलेच हादरुन गेले आहेत तर काहींनी यातील दृश्यांची मजा लुटली आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, मुलगा आणि मुलगी दोघेही क्रेनच्या मदतीने हवेत लटकलेले दिसत आहेत. दोघेही पारंपारिक लग्नाच्या पोशाखात आहेत आणि त्यांच्या कमरेला रंगीबेरंगी फुग्यांचा मोठा गुच्छ बांधलेला आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात असे दिसते की फुगे त्यांना हवेत घेऊन तरंगवत आहेत, परंतु प्रत्यक्षात ते एका मोठ्या क्रेनने लटकलेले असतात. जोडप्याने फुग्यांना घेऊन, हवेत लटकत पोज देण्याचा प्लॅन केलेला असतो,जेणेकरुन त्यांचे हे शूट रंगतदार बनेल. परंतू, त्यांच्या या प्रकल्पाने लोकांना मात्र आश्चर्यचकीत केलं. हे शूट तर कोणी काॅपीही करणार नाही अशी उपमाही व्हिडिओला देण्यात आली.
दरम्यान कपलच्या प्री-वेडिंग शूटचा हा व्हिडिओ @gagan_buttar_46 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एवढी रिस्क घेण्यापेक्षा AI कडूनच बनवून घ्यायचं होतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अजून काय काय पहाव लागणार आहे, काय माहित. मला समजत नाही की लोक असं का करतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना भीती कशी वाटली नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.