सूरत – कोरोनाच्या काळानंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या (Heart Attack) घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांत खेळताना, जीममध्ये व्यायाम करताना, नाच करताना, वरातीत नाचताना हार्ट अटॅक आल्याच्या आणि लागलीच त्या व्यक्ती मरण पावल्याच्या अनेक घटना घडत आहेत. गुरुवारी सूरतमध्ये (Surat) अशीच एक धक्कादायक गटना समोर आली आहे. योगा (Yogasana) आणि एरोबिक्स (Aerobics) करताना एका 44 वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Heart Attack In Yoga Class)
पत्नी एरोबिक्स शिकवत होती
सूरतमधील किरम चौकात गजानन एरोबिक्स आणि योगा क्लबमध्ये मुकेशभाई यांची पत्नी पायल एरोबिक्स शिकवतात. हिरा कारखान्यात काम करणारे मुकेश मेंदपरा हे सुट्टी असल्यामुळे पत्नीसोबत योगा शिकण्यासाठी तिच्या क्लासमध्ये आले होते. योगा करताना त्यांना जळजळीचा त्रास जाणवू लागला. अस्वस्थता वाढू लागल्यानं आणि छातीत जास्त दुखू लागल्यानं त्यांना रिक्षानं तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केलं.
योगा करताना पोटात जळजळ
योगा क्लब चालवणारे भरत भाई खुंटे यांनी सांगितलं की मुकेश यांची पत्नी या क्लासमध्ये एरोबिक्स शिकवतात. सुट्टीच्या दिवशी मुकेश त्यांच्या पत्नीसोबत योगा शिकण्यासाठी क्लासमध्ये येत असत. सकाळी ज्यावेळी मुकेशभाई आले त्यावेळी त्यांना पोटात जळजळ आणि मळमळीचा त्रास होत होता.
खेळता खेळता हार्ट अटॅकनं झालेले मृत्यू
1. 29 जानेवारी- वरछात 26 वर्षीय क्रिकेटर प्रशांत भारोलिया याचा खेळताना मृत्यू
2. 30 जानेवारी- राजकोटच्या एका कॉलेजात 21 वर्षांचा तरुण विवेक कुमार याचा फुटबॉल खेळताना मृत्यू
3. 5 फेब्रुवारी- जहांगीरपुरात राहणाऱ्या वकील अतुल पटेल यांच्या 27 वर्षीय मुलाचा क्रिकेटे खेळताना हार्ट अटॅकनं मृत्यू
4. 15 फेब्रुवारी- 40 वर्षीय भरत बैरया क्रिकेट खेळून घरी परतले. छातीत दुखू लागले. त्यानंतर मृत्यू
5. 19 फेब्रुवारी- राजकोटमध्ये क्रिकेट खेळताना 31 वर्षीय जिग्नेश चौहान तरुण अचानक कोसळला. त्यानंतर मृत्यू
6. 5 मार्च – ओलपाडमध्ये क्रिकेट खेळताना निमेश अहिर बेशुद्ध, उपचारादरम्यान मृत्यू