चेक प्रजासत्ताक मध्ये अमेरिकेसारखी घटना, विद्यापीठाच्या इमारतीत अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू!

या हल्ल्यात जवळपास 9 जण जखमी झाले आहेत. प्राग येथील विद्यापीठाच्या इमारतीत ही घटना घडली.

  बंदूक संस्कृतीमुळे अमेरिकेत उठसुट गोळीबार होण्याच्या घटना नेहमी घटत असतात. याला आळा घालण्यासाठी अमेरिकेत प्रयत्न केले जात आहेत तरीही गोळीबार होण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. मात्र, आता अशीच एक घटना बंदूक संस्कृती नसलेल्या देशात घडली आहे. चेक प्रजासत्ताकच्या मध्य प्राग (Central Prague) शहरात गोळीबाराची घटना (Mass shooting) घडली आहे. या घटनेत किमान दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 9 जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

  कुठं झाला गोळीबार

  मिळालेल्या माहितीनुसार,  प्राग येथील विद्यापीठाच्या इमारतीत ही घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.  संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये घटनास्थळी गोंधळ पाहायला मिळत आहे.

  चार्ल्स युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ आर्ट्समधील कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की हल्लेखोर त्यांच्या एका इमारतीत होता. त्यांनी कर्मचार्‍यांना जिथे आहे तिथेच राहण्यास सांगितले आहे. कुठेही जाऊ नका, ऑफिसमध्ये असाल तर ते बंद करा आणि फर्निचर दारासमोर ठेवा, दिवे बंद करा, असे ईमेलमध्ये सांगण्यात आले होते. पोलीस विभागाने सांगितले की चौक सील करण्यात आला आहे आणि लोकांना जवळचे रस्ते टाळण्याचे आणि आत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राग सुरक्षा सेवेच्या प्रवक्त्या जना पोस्टोवा यांनी सांगितले की, अनेक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, प्रागचे महापौर बोहुस्लाव स्वोबोडा यांनी सांगितले की, चार्ल्स विद्यापीठातील तत्त्वज्ञान विद्याशाखा रिकामी करण्यात आली आहे.

  मंत्र्यांनी हल्लेखोराच्या मृत्यूला दुजोरा दिला

  गृहमंत्री विट रकुसन यांनी चेक पब्लिक टीव्हीला सांगितले की गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की घटनास्थळी इतर कोणीही संशयित नव्हते आणि पुढे कोणताही धोका नाही, परंतु त्यांनी जनतेला पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

  झेकमध्ये बंदूक संस्कृती नाही

  झेक प्रजासत्ताकमध्ये बंदूक संस्कृती नाही. बंदुकांचा वापर ही येथे अत्यंत दुर्मिळ घटना आहे. डिसेंबर 2019 मध्ये, पूर्वेकडील ओस्ट्रावा शहरातील एका इस्पितळात एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात सहा जण ठार झाले. तेथून पळून जाण्यापूर्वी त्याने स्वतःवर गोळी झाडली.