दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली दबून 34 जणांचा मृत्यू!

कोलंबियाच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापनाने सुरुवातीला 18 लोकांच्या मृत्यूची माहिती देणारे निवेदन जारी केले होते, परंतु सध्या मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे.

    दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामधुन एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये भूस्खलन (Colombia Landslide) झालं असून या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कुडिबो आणि मेडेलिन शहरांना जोडणाऱ्या व्यस्त रस्त्यावर मातीचा डोंगर कोसळल्याने कोलंबियाच्या डोंगराळ प्रदेशात भूस्खलन झाले. ही घटना शुक्रवारी घडली. कोलंबियाच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापनाने सुरुवातीला 18 लोकांच्या मृत्यूची माहिती देणारे निवेदन जारी केले होते, परंतु सध्या मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे.

    मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश

    भूस्खलनात अनेक जण जखमीही झाले आहेत. मृतांपैकी 17 मृतदेहांची ओळख पटली असून 17 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. कोलंबियाचे उपाध्यक्ष फ्रान्सिया मार्केझ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, अपघाताच्या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे, मात्र त्यांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु अपघाताच्या ठिकाणी नुकताच मुसळधार पाऊस झाला होता. अशा स्थितीत पावसामुळे दरड कोसळल्याचे समजते. तेथे अजूनही पाऊस सुरू आहे, त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

    अन् पाहता पाहत संपूर्ण डोंगर कोसळला

    कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत ही शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर वाहनांचा ताफा उपस्थित होता, मात्र अचानक संपूर्ण डोंगर कोसळल्याचे दिसत आहे. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली गेली आणि मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागला.