India Russia Summit : पुतिनसोबतचे निर्णायक 28 तास, मोदींसोबत खाजगी जेवण आणि मोठे करार; नवी दिल्लीत रंगणार भारत-रशिया महासंवाद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Putin Modi summit 2025 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) ४ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर नवी दिल्लीत येणार असल्याची माहिती राजनैतिक सूत्रांकडून समोर येत आहे. दुपारी सुमारे ४:३० च्या सुमारास त्यांचे आगमन अपेक्षित असून त्यानंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांच्या सन्मानार्थ खाजगी जेवणाचे आयोजन करणार आहेत. जुलैमध्ये मॉस्कोमध्ये मोदींच्या स्वागतासाठी जे वैयक्तिक आतिथ्य दिले गेले, त्याच reciprocation स्वरूपात नवी दिल्लीतील हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत-रशिया परंपरागत मैत्रीला पुन्हा धार देणाऱ्या या भेटीवर जागतिक लक्ष केंद्रीत झाले आहे.
या दौऱ्यादरम्यान शुक्रवारी औपचारिक स्वागतानंतर २३ वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियन प्रतिनिधीमंडळासह उच्चस्तरीय चर्चा रंगणार असून राजनैतिकता, सुरक्षा, व्यापार, ऊर्जा, कृषी आणि सांस्कृतिक सहकार्य यांसारख्या अनेक विषयांवर सखोल विचारमंथन होईल. याआधी पुतिन राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहणार आहेत. शिखर परिषदेनंतर रशियाच्या राज्य प्रसारकाच्या इंडिया चॅनेलचे उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित राजकीय मेजवानी हा अजेंडा असेल. सुमारे २८ तासांच्या या व्यस्त वेळापत्रकानंतर ते रात्री भारतातून रवाना होतील.
या भेटीची राजनैतिक पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्ये सध्या तणावाची छाया असून अमेरिकेने भारतीय निर्यातीवर शुल्क वाढवले आहे, तसेच रशियाकडून तेल खरेदीबाबत अतिरिक्त निर्बंधांचा दबावही वाढवण्यात आला आहे. या संदर्भात भारत-रशिया आर्थिक संबंधांवर होणारा परिणाम आणि वाढती व्यापार तूट हा शिखर बैठकीतील प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. सध्या रशियाकडून भारताची आयात मोठ्या प्रमाणावर असून निर्यात तुलनेने कमी आहे, त्यामुळे व्यापार संतुलन सुधारणे हा भारताच्या दृष्टीने रणनीतिक अजेंडा असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला
संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. शिखर परिषदेपूर्वी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये S-400 क्षेपणास्त्र प्रणाली, सुखोई-३० चे आधुनिकीकरण आणि लष्करी साजोसामानाच्या वेळेवर पुरवठ्यावर चर्चा अपेक्षित आहे. भारताला अधिक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने या निर्णयांचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. “ऑपरेशन सिंदूर”सारख्या मोहिमांदरम्यान S-400 प्रणालीची कामगिरी प्रभावी ठरल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
ऊर्जा, खत, औषधनिर्माण, कृषी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यापारातही नवे करार होण्याची शक्यता आहे. रशिया दरवर्षी मोठ्या प्रमाणात खत भारताला पुरवतो आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत संभाव्य मुक्त व्यापार करारावरही चर्चा होऊ शकते. युक्रेन संघर्षावर अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांबाबत पुतिन महत्त्वपूर्ण माहिती देतील, तर भारताने कायम संवाद आणि राजनैतिक मार्गानेच तोडगा काढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत
संपूर्ण भेट केवळ औपचारिकता नसून, बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये भारताची भूमिका अधिक ठळक करणारा आणि भारत-रशिया संबंधांना नवसंजीवनी देणारा क्षण ठरू शकतो. या शिखर परिषदेचे निर्णय भविष्यातील आशियाई आणि जागतिक राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतात, यामुळे नवी दिल्लीचे राजनैतिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
Ans: दोन दिवस, सुमारे २८ तासांचा दौरा.
Ans: संरक्षण, ऊर्जा, व्यापार तूट आणि राजनैतिक सहकार्य.
Ans: बदलत्या जागतिक सत्ता-संतुलनात भारताची भूमिका अधिक बळकट होणे.






