Pakistan News : भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची बहीण आसिफा भुट्टो झरदारी यांच्या ताफ्यावर शुक्रवारी (२४ मे) सिंध प्रांतातील जामशोरो टोल प्लाझाजवळ हल्ला करण्यात आला. कालवा प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी केलेल्या या हल्ल्यात आसिफा भुट्टो थोडक्यात बचावल्या असून, त्यांच्या ताफ्यावरील हा हल्ला पाकिस्तानात नव्या राजकीय व सामाजिक उलथापालथीचा संकेत मानला जात आहे.
पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत आसिफा यांची सुखरूप सुटका केली. हल्ल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय असेंब्लीच्या सदस्या असलेल्या आसिफा भुट्टो या पाकिस्तानचे विद्यमान अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची कन्या असून, त्या सध्या सिंधमधील विविध विकास प्रकल्पांच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत.
वादग्रस्त कालवा प्रकल्पामुळे सिंधमध्ये संताप
या हल्ल्याचे मूळ सिंध प्रांतात उभारण्यात येणाऱ्या वादग्रस्त कालवा प्रकल्पात आहे. सिंधू नदी प्रणालीवर आधारित या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असून, त्यामागे पंजाब प्रांताचा पाण्यावरील वर्चस्वाचा डाव असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. हा प्रकल्प पाकिस्तान लष्कराच्या पाठिंब्याने राबवला जात असून, त्यातून सिंधच्या जलसंपत्तीवर अन्याय होतोय, असे सिंधमधील आंदोलकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रकल्पावर निर्णय घेण्यासाठी “कॉमन इंटरेस्ट कौन्सिल”मध्ये एकमत आवश्यक असल्याचे सांगत प्रकल्प अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तरीही जमिनीवरील असंतोष शमलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम
राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचा आरोप
सिंधमध्ये सत्तेत असलेली पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) ही बिलावल भुट्टो यांचे नेतृत्व असलेली पार्टी असून, तिच्यावर लष्कराच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप सातत्याने होतो आहे. जिहाद सिंध मुत्ताहिदा महाजचे अध्यक्ष शफी बर्स्ट यांनी स्पष्टपणे आरोप केला की लष्कर आपली भू-राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अशा योजनांचा वापर करत आहे. त्यांनी म्हटले की, “बिलावल भुट्टोसारखे सत्तेच्या हव्यासापोटी चालणारे नेते लष्कराच्या हातातील बाहुल्या आहेत.” आंदोलकांचे म्हणणे आहे की सिंधच्या हक्कांचे उल्लंघन करून हा प्रकल्प रेटून नेला जात असून, राष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यात त्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आपल्या संतापाचा उद्रेक आसिफा भुट्टो यांच्या ताफ्यावर केला.
हल्ल्याच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांची शक्यता
या हल्ल्यानंतर पाकिस्तानात अंतर्गत अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे लष्कराशी जवळीक असलेले राजकीय पक्ष आपले हित जपताना दिसत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक जनतेचा आक्रोश उफाळून येत आहे. पारंपरिकरित्या केंद्रशासित प्रकल्पांमध्ये सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांना दुय्यम वागणूक दिली जाते, असा आरोप पूर्वीपासून केला जातो. त्यामुळे हे आंदोलन फक्त एका प्रकल्पापुरते मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात आणखी उग्र रूप धारण करू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हा केवळ एका राजकीय व्यक्तीवरचा हल्ला नसून…
आसिफा भुट्टो यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका राजकीय व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो सिंधमधील जनतेच्या संतप्त भावनांचा उद्रेक आहे. जलसंपत्तीच्या वाजवी वाटपाचा प्रश्न आणि लष्करी हस्तक्षेप यामुळे पाकिस्तानात सामाजिक समतोल बिघडत चालला आहे. या घटनेंतून स्पष्ट होते की, पाकिस्तानमधील अंतर्गत मतभेद आणि प्रांतिक असंतोष दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जर या समस्या वेळीच सोडवण्यात आल्या नाहीत, तर त्याचे दुष्परिणाम पाकिस्तानच्या एकात्मतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात.