फोटो सौजन्य: iStock
टोरंटो: कॅनडातील भारतीय दूतावासांनी आयोजित केलेली कॉन्सुलर कॅम्प शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. यामागचे कारण म्हणजे कॅनडाने शिबिरांना सुरक्षा देण्यास नकार दिलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने नियोजित शिबिरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सींनी या शिबिरांना किमान सुरक्षा पुरविण्यात असमर्थता व्यक्त केली. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
भारतविरोधी हिंसक घटनांमुळे सुरक्षा चिंतेत वाढ
टोरंटो आणि व्हँकुव्हरमध्ये दूतावासांनी स्थानिक सहकार्याने भारतीय नागरिकांसाठी शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांमध्ये भारतीय नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र तसेच इतर सुविधांची सोय करण्यात आली होती. परंतु, काही अलीकडील घटनांमध्ये भारतविरोधी अतिरेक्यांनी हिंसाचार घडवून आणल्याने सुरक्षा चिंतेत वाढ झाली आहे. ब्रॅम्प्टन येथे हिंदू सभा मंदिर संकुलात हिंसक घटना घडली होती. या ठिकाणी काही अतिरेक्यांनी महिलां, लहान मुले, आणि वृद्धांवर हल्ला केला. त्यामुळे सुरेक्षेची मागणी करण्यात आली होती. मात्र, कॅनडाच्या सुरक्षा कंपन्यांनी नकार दिला. यामुळे शिबिरे रद्द करण्यात आली.
कॅनडाने व्हिएन्ना करार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन न केल्याचे भारताचे मत
कॅनडाने व्हिएन्ना करार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन न केल्याचे भारताने मत मांडले आहे. भारतीय मुत्सद्दींवर लक्ष ठेवण्याच्या घटनांनी दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढत चालला आहे. भारताने कॅनडा सरकारकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे. भारतीय दूतावासाच्या मते, असे शिबिरे रद्द करणे अत्यंत खेदजनक असून भारतीय नागरिक आणि अर्जदारांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी व्हँकुव्हर आणि सरे येथे आयोजित शिबिरांना व्यत्यय आल्याचेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. भविष्यातील शिबिरांचे आयोजन कॅनडाच्या सुरक्षा व्यवस्था योग्यरित्या सुनिश्चित झाल्यासच करण्यात येईल, असेही सांगितले.
दोषींवर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्री मान यांची मागणी
कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे शीख फुटीरतावाद्यांनी एका हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. यादरम्यान खलिस्तान समर्थकांनी मंदिरात घुसून हिंदूंना लाठीमार केला. त्यानंतर या प्रकरणावर भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. तसेच त्यांनी केंद्र सरकारने कॅनडाच्या सरकारशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.
पंतप्रधान मोदींनी देखील हल्ल्याचा निषेध केला
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करत, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचा हा चुकीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून न्यायाची आशा व्यक्त केली. कॅनडात राहत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल भारत सरकार गंभीर चिंता व्यक्त करत आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत.
हे देखील वाचा- पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! विजयाबद्दल कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा