फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रमुख आणि ISKCON चे सचिव चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर हिंदू समाजातील लोकांनी तीव्र निषेध करत अनेक निदर्शने काढली. तसेच ISKCON ने त्यांच्या जामीनासाठी न्यालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका बांगलादेश न्यालयाने फेटाळून लावली. त्यानंतर देखील हिंदू लोकांनी आंदोलन केले. या संघर्षादरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दास यांच्या अटकेवरुन बांगलादेशाच्या चितगाव या शहराजळ झालेल्या संघर्षात या वकिलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चितगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, चितगावमध्ये वकील सैफुल इस्लाम अलिफ यांची हत्या करण्यात आली. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, चितगाव बार असोसिएशनचे महासचिव अशरफ हुसैन रज्जाक यांनी सांगितले आहे की, इस्लाम अलिफची निर्घृण हत्या करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, न्यायालयीन कामकाज स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घटनेमुळे चितगावसह संपूर्ण बांगलादेशात तणाव निर्माण झाला आहे. कायदा अंमलबजावणी यंत्रणा हाय अलर्टवर असून, राजधानी ढाका आणि चितगावमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. चिन्मय दास यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी हजारो लोक न्यायालयाबाहेर जमले आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
चिन्मय ब्रह्मचारींच्या अटकेमुळे तणाव
चितगाव न्यायालयात चिन्मय ब्रह्मचारी यांच्या अटकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. त्यांच्या जामीन अर्ज फेटाळल्यानंतर निदर्शकांनी जेल व्हॅन अडवली. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराचे गोळे आणि सोनिक ग्रेनेडचा वापर केला. संघर्षानंतर चिन्मय ब्रह्मचारींना तुरुंगात पाठवण्यात आले. चिन्मय ब्रह्मचारींवर बांगलादेशी राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा आरोप ठेवून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीने याप्रकरणातून माघार घेतल्याने खटल्याची सत्यता प्रश्नचिन्हाखाली आहे.
हत्येच्या तपासाचे आदेश
चितगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश सरकारने तणावग्रस्त भागांमध्ये सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मुहम्मद युनूस यांनी वकिलाच्या हत्येचा निषेध केला असून, सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. शांतता राखण्याचे आवाहन करत, युनूस यांनी जातीय सलोखा कायम ठेवण्यावर भर दिला आहे. चितगावमधील वकिलाच्या हत्येमुळे आणि चिन्मय दास यांच्या अटकेमुळे देशातील धार्मिक तणाव चिघळला आहे, ज्यामुळे सरकार आणि अल्पसंख्याक समुदायांमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.