जेन-झी पुन्हा रस्त्यावर; सरकारविरोधात आवाज उठवत केली पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
काठमांडू : नेपाळमध्ये बालेन शाह यांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला तीच जेन-झी पिढी आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. नव्या सरकारला अद्याप १५० दिवसही पूर्ण झालेले नसताना बालेन शाह यांना जनतेचा रोष, संसदेचा दबाव आणि पक्षातील नाराजीचा सामना करावा लागत आहे. बालेन शाह पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच युवा आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काठमांडूतील मैतीघर मंडला येथे पुन्हा आंदोलन केले.
नेपाळमध्ये विरोधी पक्षाचे खासदारही बालेन शाह यांना घेरताना दिसत आहेत. संसदेत त्यांच्या वारंवार अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सभापती डोल प्रसाद अर्याल यांनी २६ ऑगस्ट रोजी शाह यांना संसदेत उपस्थित राहून खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या ३९ बैठकींपैकी बालेन शाह केवळ ५ बैठकांना उपस्थित राहिले आहेत. बालेन शाह यांनी २७ मार्च रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांच्या आतापर्यंतच्या निर्णयांमुळे जनता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे.
सरकार स्थापनेपूर्वी ज्या जेन-झी पिढीचा बालेन शाह यांना पाठिंबा होता, तीच तरुणाई आता त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. भारतासोबतच्या सीमा वादावरूनही शाह यांना सातत्याने टीकेला सामोरे जावे लागले. भारतीय हद्दीत नेपाळकडून झालेल्या अतिक्रमणासंदर्भातील त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधक नाराज झाले.
भारतीय सैन्यात नेपाळी भरतीची मागणी
पोखरा येथे माजी गोरखा सैनिकांनी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात नेपाळी नागरिकांची रखडलेली भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी कायम ठेवली आहे. या मुद्द्यांमुळे निर्माण झालेला तणाव आता आरएसपीमध्येही (राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष) पोहोचला आहे. खासदार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेपासून शाह यांचे वाढते अंतर आणि त्यांच्या एकतर्फी कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेपाळमध्ये मोठा जलप्रलय
दुसरीकडे, तिबेट सीमेजवळील नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी हानी झाली. या महापुराच्या तडाख्यात अनेक गावे आणि विविध प्रकल्पस्थळे वाहून गेल्याचे वृत्त असून, सुमारे १००० जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या आकडेवारीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या जलप्रलयात १३३ भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.






