दिलासादायक ! डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवला; म्हणाले, 'पाकिस्तानच्या विनंतीवरून...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणवर हल्ल्यांमुळे जागतिक तेल संकट ओढवताना दिसत आहे. त्यात अमेरिकेकडून शस्त्रसंधी लागू केली होती. मात्र, आता ही शस्त्रसंधी पुन्हा वाढवण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी तात्पुरत्या स्वरूपात वाढवली आहे, ज्यामुळे मध्यस्थांना वाटाघाटी करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा तात्पुरता शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील समोरासमोर चर्चेच्या नवीन फेरीची तयारी करण्यासाठी मध्यस्थांना अधिक वेळ दिला जात आहे. शस्त्रसंधी संपण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या विनंतीवरून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते इराणकडून अशा प्रस्तावाची वाट पाहत आहेत, ज्यात सहमती आणि एकमताच्या सर्व मुद्द्यांचा समावेश असेल.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे सध्यापुरता संघर्ष पुन्हा उफाळून येण्याचा धोका कमी झाला आहे. मात्र, दोन्ही बाजूंमध्ये तीव्र मतभेद कायम आहेत. इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी कायम आहे आणि उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांचा पाकिस्तान दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.
अमेरिकेकडून केलेली नाकेबंदी अयोग्य
वृत्तानुसार, पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चेची तयारी सुरू आहे. मात्र, इराणने म्हटले आहे की कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परस्परविरोधी विधाने आणि अमेरिकेच्या कृतींमुळे निर्णय रखडला आहे. त्यांनी अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीला ‘अस्वीकार्य’ म्हटले.
अमेरिकेकडून पाकिस्तानचा दौरा रद्द
अमेरिकेनेही आपला पाकिस्तान दौरा रद्द केला असून, पाकिस्तानने चर्चा सुरू ठेवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरून शस्त्रसंधी वाढवली आहे. त्यांनी दावा केला की इराणचे नेतृत्व ‘एकत्रित नाही’. इराण एक समान प्रस्ताव घेऊन येईपर्यंत पाकिस्तानने त्यांना थांबण्यास सांगितले आहे. मात्र, अमेरिकेची नाकेबंदी कायम राहील.






