फोटो सौजन्य: Gemini
हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हा एक महत्त्वपूर्ण विधी मानले जातो, ज्याद्वारे दिवंगत आत्म्याला शांततापूर्ण निरोप दिला जातो. परंतु मागील काही वर्षांत हा दुखःद प्रसंग ‘इव्हेंट’ होताना दिसत आहे. मोठे राजकीय नेते, सेलेब्रिटी यांच्या निधनानंतर होणाऱ्या विधीला सोहळ्याचे रूप येत आहे. वास्तविक ही परंपरा सन्मानाने जपणे आवश्यक आहे. हा प्रसंग ‘इव्हेंट कंपन्या’च्या हातात जाऊ नये यासाठी तरुण पिढी यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे.
राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात यासाठी गावोगाव अंतिम संस्कार विधीबाबत जागृती निर्माण केली जात आहे. अंत्ययात्रेदरम्यान आवश्यक असणारे विधी, पार्थिवाचे अत्यंत आदराने केले जाणारे अंतिम संस्कार आणि अग्नीसंस्काराच्या अचूक पद्धती या सर्व बाबींचे प्रशिक्षण तरुणवर्ग घेताना दिसत आहे. याकडे एक सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जात आहे.
हिंदू धर्मात मृत्यूपश्चात होणारा अंत्यसंस्कार हा सोळा संस्कारांपैकी अखेरचा संस्कार मानला जातो. हा विधी मृतदेहाचे अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमध्ये विलीनीकरण करण्यासाठी तसेच आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग सुलभ करण्यासाठी केला जातो. अंत्यविधी साधारणपणे मृत्यूनंतर २४ तासांच्या आत मृतदेहाचे दहन (अग्निदाह) करून पार पाडला जातो. तिथे मंत्रोच्चारांच्या गजरात मृत व्यक्तीच्या थोरल्या मुलाच्या हस्ते चितेला अग्नी दिला जातो. त्यानंतर अस्थीचे पाण्यात विसर्जन केले जाते आणि पुढील तेरा दिवस शोक पाळला जातो, तसेच शुद्धीकरण विधीचे आचरण केले जाते.
आजच्या पिढीला हे विधीवत संस्कार अवगत नाहीत, त्यामुळे काही इव्हेंट कंपन्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातून अंत्यविधी हिंदू अंत्यसंस्कार विधीशी संबंधित परंपरा आणि चालीरीतींचे पालन तेवढ्या भावनिक पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे तरुण जागृत होताना दिसत आहे.
अंत्यसंस्कार ही एक पवित्र धार्मिक विधी आहे. ती एखादा व्यावसायिक उपक्रम किवा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी व्यवस्थापित करावी अशी एखादी उत्सवी घटना नव्हे. या धारेणेतून आजचा तरुण पुढे येऊन यावे प्रशिक्षण घेत आहे. या पावित्र्याचे जतन करण्यासाठी ते या संपूर्ण प्रक्रियेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत आहेत.
अनेक तरुण आता अंत्यसंस्कार पारंपरिक आणि सन्मानपूर्वक पद्धतीने पार पाडण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, जेणेकरून एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर ते संबंधित कुटुंबांना भावनिक आणि प्रक्रियात्मक आधार देऊ शकतील. युवक-युवतींना अंत्ययात्रेशी संबंधित आवश्यक विधी, पार्थिवाचे आदरपूर्वक अंत्यसंस्कारासाठी सिद्धीकरण आणि दहनविधीच्या योग्य कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, शोककुल कुटुंबांना केवळ तांत्रिक मदतच नव्हे, तर भावनिक आधारही उपलब्ध करून द्यावा.
अनेक स्वयंसेवी संस्थाही या तरुणांना है प्रशिक्षण देत आहेत, या तरुणांनी अंत्ययात्रेदरम्यान आवश्यक असलेल्या लहान असो वा मोठी प्रत्येक सेवेमध्ये साहाय्य करावे हा त्यामागील उद्देश आहे.






