Iran-US War : 'इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल'; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणवर हल्ल्यांमुळे जागतिक तेल संकट ओढवताना दिसत आहे. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केले आहे. ‘इराणसोबतचा संभाव्य नवीन करार हा माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्या कार्यकाळात तेहरानसोबत झालेल्या करारापेक्षा चांगला असेल. इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यात होणारा करार हा (माजी अध्यक्ष) बराक ओबामा आणि जो बायडेन यांनी स्वाक्षरी केलेल्या जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन (JCPOA) पेक्षा खूपच चांगला असेल. त्यांनी जुन्या कराराला अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आणि सर्वात वाईट करारांपैकी एक म्हटले. ट्रम्प यांनी दावा केला की, या करारामुळे इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याचा मार्ग मिळू शकला असता, जो त्यांच्या प्रशासनाने रोखला. त्यांनी असाही आरोप केला की, त्यावेळी इराणला अब्जावधी डॉलर्स रोख रक्कम देण्यात आली होती आणि ही रक्कम अमेरिकन बँकांमधून काढण्यात आली होती.
तसेच जर हा करार रद्द केला नसता, तर पश्चिम आशिया आणि इस्रायलसह अनेक प्रदेशांमध्ये अण्वस्त्रांचा धोका वाढला असता. जर त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन करार झाला, तर त्यामुळे जगभरात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित होईल आणि पूर्वीच्या सरकारांच्या चुका सुधारल्या जातील, असे म्हणत ट्रम्प यांनी ओबामा आणि बायडेन सरकारवर निशाणा साधला.
व्हाईट हाऊसची पोस्ट चर्चेत
दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्हाईट हाऊसने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टकडे केवळ एक ‘नेहमीचा संदेश’ म्हणून दुर्लक्ष करणे कठीण आहे; कारण ही पोस्ट मध्यपूर्वेतील एका मोठ्या लष्करी घडामोडीकडे निर्देश करणारा थेट संकेत मानली जात आहे. सोमवारी (दि.२०) व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोसोबत अत्यंत आक्रमक स्वरूपाची एक ओळ (कॅप्शन) लिहिलेली होती: ‘LOCKED IN MODE: ACTIVATED… आज सोमवार आहे. कोणतीही सबब नाही. फक्त विजय.’






