सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर गेल्या चार वर्षांपासून तणाव सुरू आहे. बॉर्डरवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. परंतु आता लवकरच दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित होईल असे दिसते आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात लवकरच सीमा वादावर चर्चा होणार आहे. या चर्चेचा मुख्य हेतू हा वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता प्रस्थापित करणे असा आहे. एप्रिल 2020 साली भारत चीन सीमेवर झालेल्या गलवान व्हॅली संघर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही नुकतेच आपल्या वक्तव्यातून असे संकेत दिले आहेत. भारत आणि चीनने अंतिम तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. LAC चा आदर करणे आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करणे हे दोन्ही देशांसाठी फार महत्त्वाचे आहे. समान आदर, संवेदनशीलता आणि समान हितसंबंध यामुळेच दोन्ही देशातील संबंध चांगले होऊ शकतात.
SCO परिषदेत चीनचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले होते की, भारत आणि चीन हे जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले विकसनशील देश आणि मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आहेत. भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांच्या बॉर्डर ओलांडतात आणि त्यांच्यातील संबंध सुधारण्याची गरज आहे. कझाकस्तानमधील एससीओ परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर वांग यांनी असे वक्तव्य केले आहे. दोन्ही पक्षांनी संबंध चांगले करण्यासाठी संवादही वाढवला पाहिजे. आणि मिळून पुढे जाण्यासाठी सकारात्मक देवाण घेवाण केलं पाहिजे. आणि सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत.
भारताचा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी असे सांगितले होते की, ‘ आम्ही भारत चीन सीमावाद यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.’ भारत आणि चीन चे संबंध आणखी सुधारण्यासाठी भारतानेही सकारात्मक भूमिका दाखवली आहे. तरीही भारताने सीमेवर सुरक्षा व्यवस्था भक्कम ठेवली आहे. जेणेकरून कोणत्याही देशाने हल्ला केल्यास भारताला सजग राहता येईल आणि प्रतिउत्तर देता येईल.
चीनचा भारतावर आरोप
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यांनतर चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रात ‘भारत चीन संबंध’ यावर एक लेख लिहला होता. त्यात असे लिहले होते की, ‘ LAC वाद काही नवीन नाही तो कित्येक दशकांपासून अस्तित्त्वात आहे’ तसेच चीनची बाजू मांडताना पुढे असे लिहले आहे की,’ गेल्या काही वर्षात भारताने देशांतर्गत धोरणांमध्ये अनेक चीन विरोधी गोष्टी केल्या आहेत. ज्यात चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकणे, चीनच्या वस्तू आणि गोष्टी न वापरणे या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे ग्लोबल टाईम्सने भारताचे चीनसोबत संबंध बिघडण्यासाठी भारतालाच जबाबदार ठरवले होते.