बीजिंग : चीनमध्ये मोठा भूकंप (Earthquake in China) झाला. या भूकंपाने चीनचे जनजीवन अक्षरश: विस्कळीत केले असून, या भूकंपात वित्तहानीसह मोठी जीवितहानीही झाली आहे. चीनमध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला असून, 220 जण जखमी झाले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
चीनच्या गान्सू प्रांताला मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. ज्यामध्ये तिथल्या आणि जवळच्या किंघाई प्रांतात अनेक इमारती कोसळल्या. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने म्हटले आहे की, भूकंपाची तीव्रता 5.9 आणि खोली 10 किलोमीटर होती. सकाळपासून येथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सरकारने एक बचाव पथक पाठवले आहे जे स्थानिक बचाव पथकाला मदत करत आहे.
सरकारी मीडिया एजन्सी शिन्हुआने म्हटले आहे की, गान्सूमध्ये 86 लोक ठार आणि 96 जखमी झाले, तर किंघाईमध्ये नऊ लोक ठार आणि 124 जखमी झाले. घटनास्थळावरून व्हिडीओ फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये बचाव कर्मचारी कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागातील वीज आणि पाणीपुरवठाही खंडित झाला आहे.