फिनलँडच्या माजी पंतप्रधान Sanna Marin यांचा 'क्रांतिकारी' कामाचा प्रस्ताव (Photo Credit- X)
मारिन यांच्या म्हणण्यानुसार, अधिक लवचिक कामाच्या वेळापत्रकामुळे (Flexible Work Schedule) कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येईल. “लोकांना त्यांच्या कुटुंबियांसाठी, प्रियजनांसाठी, छंदांसाठी आणि संस्कृतीसारख्या जीवनातील इतर महत्त्वाच्या पैलूंसाठी अधिक वेळ मिळाला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “कामाच्या जीवनात पुढील टप्पा म्हणून आम्ही हे पाऊल उचलू शकतो,” असेही त्यांनी या नवीन प्रस्तावावर भाष्य करताना नमूद केले. सध्या फिनलँडमध्ये कामाचा सामान्य आठवडा पाच दिवसांचा असून, दिवसाला आठ तास काम करणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान होण्यापूर्वी सन्ना मारिन यांनी फिनलँडच्या परिवहन मंत्री (Minister of Transport) म्हणून काम पाहिले होते. परिवहन मंत्री असतानाही, त्या शॉर्ट वर्क वीक (कमी कामाचे तास असलेला आठवडा) च्या बाजूने ठामपणे बोलल्या होत्या. कर्मचाऱ्यांचे संबंध आणि उत्पादकता वाढवण्यासाठी (Productivity) कामाचे तास कमी करणे फायद्याचे आहे, असे त्यांचे मत होते.
मारिन या केंद्र-डाव्या पक्षांच्या युतीचे (Center-Left Coalition) नेतृत्व करत होत्या. विशेष म्हणजे, या युतीमध्ये असलेल्या चारही पक्षांचे नेतृत्व महिला नेत्यांकडे होते. सन्ना मारिन यांच्या या प्रस्तावामुळे जगभरात कामाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






