ParisMosques : फ्रान्समध्ये मुस्लिमांविरुद्ध द्वेष! पॅरिसमधील ९ मशिदींबाहेर फेकली डुकरांची मुंडकी, त्यावर मॅक्रॉनचे लिहिले नाव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पॅरिस व परिसरातील ९ मशिदींबाहेर डुकरांची मुंडकी फेकल्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र अस्वस्थता.
काही मशिदींवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे नाव लिहिलेले आढळले; पोलिसांनी चौकशी सुरू केली.
या प्रकारामागे परकीय हस्तक्षेपाचा संशय; गेल्या सहा महिन्यांत मुस्लिमविरोधी घटनांमध्ये ८१ टक्के वाढ.
Paris mosques pig heads : युरोपमधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या फ्रान्समध्ये इस्लामविरोधी भावना धोकादायक पातळीवर पोहोचताना दिसत आहेत. राजधानी पॅरिससह परिसरातील किमान नऊ मशिदींच्या बाहेर डुकरांची मुंडकी फेकण्यात आल्याने मुस्लिम समाजात अस्वस्थता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मशिदींतील पाच ठिकाणी तर थेट राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे नाव लिहिलेले होते.
पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीतील चार व आसपासच्या परिसरातील पाच मशिदींबाहेर डुकरांची मुंडकी आढळली. फ्रेंच पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे. पोलिस प्रमुख लॉरेंट नुनेज यांनी म्हटले की, “या प्रकारामागे परकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही. कुणीतरी फ्रान्सला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
मुस्लिम धर्मीयांसाठी डुकराचे मांस व त्याचा स्पर्श निषिद्ध असल्यामुळे या घटनेने मोठी भीती पसरली आहे. एका मशिदीच्या अध्यक्षाने सांगितले – “अशा घटना पाहणे अत्यंत भयानक आणि निराशाजनक आहे. जर ते हे करू शकतात, तर पुढे आणखी कोणते भयावह प्रकार घडू शकतात, ही काळजी सर्वांना सतावते.”
फ्रान्स सध्या आर्थिक संकटातून जात असून, त्यामुळे सामाजिक अस्वस्थता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर काहीजण परकीय शक्तींना दोषी ठरवत आहेत. गेल्या मे महिन्यात तीन सर्बियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर परकीय शक्तींसोबत संबंध ठेवून यहुदी प्रार्थनास्थळ व होलोकॉस्ट स्मारकाची तोडफोड केल्याचा आरोप होता. त्यामुळे या नवीन प्रकरणातही परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फ्रेंच मानवाधिकार आयोगाच्या २०२४ च्या अहवालानुसार, देशात वंशवाद व भेदभावाची प्रकरणे वाढत आहेत. केवळ जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांतच १८१ मुस्लिमविरोधी घटना नोंदल्या गेल्या, जे मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ८१ टक्क्यांची वाढ दर्शवते. ADDAM या मुस्लिमांविरुद्ध भेदभावाविरोधात लढणाऱ्या संघटनेचे प्रमुख बसिरू कामारा यांनी सांगितले “आज मशिदींमध्ये जाणारे लोक स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. आमच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक व अस्वस्थ करणारी आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL
गृहमंत्री ब्रुनो रिटेलो यांनी पत्रकार परिषदेत मुस्लिम समाजाला आश्वासन दिले “आमचे मुस्लिम नागरिक शांततेत आपला धर्म पाळू शकतील, यासाठी सरकार ठाम पावले उचलेल.” त्यांनी या प्रकाराला गंभीरतेने घेत चौकशीला गती देण्याचे आश्वासन दिले आहे. ही घटना केवळ एका देशापुरती मर्यादित नाही. धर्म, जाती व संस्कृतीवरून पसरवला जाणारा द्वेष आज जागतिक पातळीवर मोठे संकट बनत चालला आहे. फ्रान्समधील मुस्लिम समाज आज भीतीच्या छायेत आहे आणि त्यांना शासनाकडून ठोस सुरक्षेची अपेक्षा आहे. जर वेळेत यावर नियंत्रण मिळवले नाही, तर समाजातील फूट अधिकच वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.