फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बर्लिन: टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क सध्या जगभरातील राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील मतांमुळे चर्चेचा विषय बनत आहेत. काही देशांमध्ये त्यांनी उजव्या विचारसरणीच्यापक्षांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर तीव्र टिका केली जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतेच मस्क यांच्यावर निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “दहा वर्षांपूर्वी कोणी विचार केला असता का की जगातील मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक अनेक देशांतील निवडणुकांवर प्रभाव टाकेल?” नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांनीही यावर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “युरोपीय देशांच्या लोकशाही प्रक्रियेत अशा हस्तक्षेपांमुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यास धोका निर्माण होऊ शकतो.”
जर्मनीतील निवडणुकीत देखील मस्कचा हस्तक्षेप
जर्मनीमध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार आहेत. मस्क यांनी जर्मनीतील विरोधी पक्ष अल्टरनेटिव फर ड्यूशलँड (AFD) ला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर AFD पक्षाचे चान्सलर उमेदवार एलिस वीडेल यांच्यासोबत लाइव्ह कार्यक्रम करण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी असेही म्हटले की, “जर्मनीला फक्त AFDच वाचवू शकते.” यामुळे जर्मनीतील सत्ताधारी पक्षाने मस्क यांच्या हस्तक्षेपाचा तीव्र विरोध केला आहे. जर्मनीच्या चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी मस्क यांना “ट्रोल” संबोधले आणि त्यांचा पाठिंबा नाकारला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे मस्कचा दर्जा वाढला
मस्क यांचा राजकीय प्रभाव अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला होता. ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या कर्तृत्वाचे महत्त्व वाढले आहे. ट्रम्प सरकारमध्ये मस्क डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) सांभाळणार आहेत. या विभागाचा उद्देश सरकारी खर्चात एक तृतीयांश कपात करणे आहे.
मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी दावा केला आहे की, “भले ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले असतील, पण खरी सत्ता मस्क यांच्या हातात आहे.” जगभरातील निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या मस्क यांच्या कृतींवर जगभरातील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकांमध्ये अशा हस्तक्षेपांमुळे लोकशाही प्रक्रियेला हानी पोहोचू शकते, असा इशारा युरोपमधील अनेक नेत्यांनी दिला आहे.
अमेरिकेतील H-1B व्हिसा वाद
अमेरिकेत H-1B व्हिसावरुन पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद उभारला आहे. सीनेटर बर्नी सॅंडर्स यांनी H-1B व्हिसा प्रोग्रामवर टीका करत म्हटले की, “याचा हेतू सर्वोत्तम कौशल्य असलेल्या लोकांना आणणे नाही, तर कमी पगारावर परदेशी कामगार नेमणे आहे.” त्यांनी एलॉन मस्क यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या कंपन्या, जसे की टेस्ला आणि स्पेसएक्स, स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून परदेशी कामगारांना कमी पगारात नियुक्त करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तिबेट भूकंपात मृतांचा आकडा वाढला; 126 जणांचा बळी तर 188 जण जखमी