'जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…' भारताने UN मध्ये का केले 'असे' चकित करणारे विधान? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
collateral consequences Ukraine conflict : रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या संघर्षात हजारो निष्पाप जीव गमावले गेले, लाखो लोक विस्थापित झाले आणि संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटले. “युद्धभूमीवर कोणताही उपाय सापडत नाही, निष्पापांचे प्राण जाणे अस्वीकार्य आहे”, अशा ठाम शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपली भूमिका मांडली. गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) झालेल्या महासभेच्या चर्चेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर भाष्य केले. ‘युक्रेनच्या व्यापलेल्या प्रदेशातील परिस्थिती’ या अजेंड्यावर झालेल्या चर्चेत भारताने स्पष्ट केले की, संघर्षाचा परिणाम फक्त युरोपवर नाही, तर संपूर्ण जगावर होत आहे विशेषतः ग्लोबल साउथमधील देशांवर, जे आधीच आर्थिक अडचणीत आहेत.
हरीश यांनी महासभेत सांगितले, “या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, अन्नधान्य पुरवठा खंडित झाला आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्या चिंता ऐकल्या गेल्या पाहिजेत आणि योग्य मार्गाने सोडवल्या पाहिजेत.” ग्लोबल साउथ म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागे असलेले किंवा विकसनशील देश. आज हेच देश युद्धामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. भारताने त्यांचा आवाज जगासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रांतून केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेला आर्थिक झटका? भारत-चीन डॉलरविरोधी मोर्चावर; लवकरच येऊ शकते नवीन पेमेंट सिस्टम
भारताने पुन्हा एकदा अधोरेखित केले की युक्रेन युद्धाचा अंत केवळ राजनैतिक प्रयत्नांतूनच शक्य आहे. हरीश म्हणाले, “आम्हाला वाटते की शाश्वत शांततेसाठी सर्व भागधारकांचा सहभाग आवश्यक आहे. युद्धाचा काळ नाही, संवादाचाच काळ आहे.” भारताने गेल्या महिन्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये झालेल्या शिखर परिषदेचे स्वागत केले. त्यात झालेल्या चर्चेचे कौतुक करत भारताने सांगितले की अशा संवादांमधूनच भविष्यकाळात शाश्वत शांततेची दिशा ठरू शकते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या संघर्षावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. ते पुतिन, झेलेन्स्की तसेच युरोपियन नेतृत्वाशी सतत संवाद साधत आहेत. अलीकडेच त्यांनी युरोपियन युनियनचे वरिष्ठ नेते अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी संवाद साधला. सोशल मीडिया X वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले की, “परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच युक्रेन संघर्ष लवकर संपवण्याबाबतही विचारविनिमय झाला.” मोदी यांचे नेहमीचे स्पष्ट मत आहे “हा युद्धाचा काळ नाही.” त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हीच भूमिका ठामपणे मांडली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी देखील युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेन संघर्षावर विचारविनिमय झाला. जयशंकर म्हणाले, “भारत या संघर्षाचा लवकर अंत व्हावा आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.” सिबिहा यांनीही जयशंकर यांना युद्धाची सध्याची परिस्थिती आणि “न्याय्य शांततेसाठी” युक्रेनच्या प्रयत्नांची माहिती दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र
महासभेत भारताने दिलेला संदेश अत्यंत मानवीय आणि संतुलित होता. युद्धामुळे गेलेले निष्पापांचे जीव, वाढलेली इंधन-अन्न संकटे आणि विस्थापित झालेल्या लाखो कुटुंबांचा संदर्भ देत भारताने पुन्हा सांगितले “शांततेसाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे. युद्धाने कधीही समस्यांचे निराकरण होत नाही.”