नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर मोठा हल्ला, काठमांडूमध्ये प्रवाशांना मारहाण आणि त्यांचे सामान लुटले, अनेक जण जखमी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
काठमांडूमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक व लुटमार; सात ते आठ प्रवासी जखमी.
हल्लेखोरांनी प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम व सामान लुटले; बसच्या सर्व खिडक्या फोडल्या.
नेपाळी लष्कराच्या हस्तक्षेपामुळे प्रवाशांचे प्राण वाचले, तर भारत सरकारने तातडीने त्यांना विमानाने दिल्लीला आणले.
Nepal bus attack : नेपाळची राजधानी काठमांडू सध्या प्रचंड अशांततेच्या छायेत आहे. सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसवर मोठा हल्ला झाला. आंध्र प्रदेशातील यात्रेकरू पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन करून परत येत असताना त्यांच्या बसवर समाजकंटकांनी अचानक दगडफेक सुरू केली. बसच्या सर्व खिडक्या फोडण्यात आल्या, प्रवाशांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे मोबाईल फोन, बॅगा व रोख रक्कम लुटण्यात आली. या हल्ल्यात सात ते आठ जण गंभीररीत्या जखमी झाले असून उर्वरित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसचे चालक राज यांनी सांगितले की, “भारताकडे परतत असताना अचानक जमावाने आमच्या बसवर दगडफेक केली. आमचे सर्व सामान लुटले गेले. प्रवाशांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मात्र, नेपाळी लष्कराचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आम्हाला वाचवले.”
बस कर्मचारी श्याम निषाद यांनी देखील हाच अनुभव सांगितला. “आमच्या गाडीत 40 हून अधिक यात्रेकरू होते. अचानक झालेल्या हल्ल्यात सात-आठ जण जखमी झाले. आम्ही मदतीसाठी ओरडत होतो, पण नेपाळी लष्कर आले नसते तर कदाचित परिस्थिती अधिक भयानक झाली असती,” असे त्यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम
या हल्ल्यामुळे भारतीय प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर भारत सरकारने तातडीने हालचाली करत सर्व अडकलेल्या प्रवाशांना काठमांडूहून दिल्लीला विमानाने हलवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी हल्लाग्रस्त बस उत्तर प्रदेशातील महाराजगंजजवळील सोनौली सीमेवर पोहोचली.
या घटनेनंतर भारतीय प्रशासनाने तातडीने सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण नेपाळमधील तणावग्रस्त परिस्थिती कोणत्याही क्षणी सीमावर्ती भागात पसरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय प्रवाशांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटन क्षेत्रावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पशुपतिनाथ मंदिर हे हिंदू श्रद्धाळूंसाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे. दरवर्षी हजारो भारतीय यात्रेकरू येथे दर्शनासाठी जातात. परंतु अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे भारतीय पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
हल्ल्याच्या वेळी प्रवाशांमध्ये हाहाकार माजला होता. अनेक प्रवासी रक्तबंबाळ झाले, महिलांच्या हातातील दागिने हिसकावले गेले, मुलांच्या डोळ्यांदेखत मोबाईल व पर्स चोरल्या गेल्या. “आम्हाला वाटले की आता आम्ही वाचणार नाही. बसच्या सर्व खिडक्या फोडल्या गेल्या होत्या आणि आम्ही एकमेकांना धरून बसलो होतो. तो अनुभव आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही,” असे एका जखमी यात्रेकरूने सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र
नेपाळमधील सध्याच्या राजकीय व सामाजिक अस्थिरतेमुळे अशा घटना वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारत-नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते घट्ट असले तरी भारतीय प्रवाशांवरील हल्ल्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. यापुढे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेपाळ सरकार कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काठमांडूमधील हा हल्ला केवळ काही प्रवाशांवरील हिंसाचार नाही, तर तो भारत-नेपाळ संबंधांना धक्का देणारा प्रकार ठरू शकतो. प्रवाशांचे प्राण नेपाळी लष्करामुळे वाचले असले तरी त्यांचा अनुभव अत्यंत भयावह होता. भारत सरकारने तातडीने मदत केली, मात्र या घटनेनंतर भारतीय प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अधिक गंभीर पावले उचलण्याची गरज आहे.