खामेनेईंच्या हत्येचा बदला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान : अमेरिका-इराण यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लक्ष्य केल्या जाणाऱ्या व्यक्तींची यादी एका इराणी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. या यादीत अमेरिका, इस्त्रायल आणि युरोपीय देशांतील नेत्यांचा समावेश आहे.
वृत्तपत्राने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इतर प्रमुख नेत्यांची छायाचित्रे असलेले एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. ही यादी इराणच्या राजधानीतील प्रशासनाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘हमशहरी’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. या चित्रासोबत ‘अचानक मृत्यूसाठी तयार रहा’ असा मथळा होता. त्यात मोजतबा खामेनेई यांचे एक निवेदनही होते, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, बदला घेणे ही आमच्या राष्ट्राची इच्छा आहे आणि तो घेतलाच पाहिजे. मोजतबा यांनी हे निवेदन त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीनंतर दिले होते.
रुबियो, स्टारमर, रुबियोचाही समावेश
वृत्तपत्राच्या छायाचित्रांसहित यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, इस्त्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांचा समावेश आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येसाठी वृत्तपत्राने या सर्व नेत्यांना जबाबदार धरले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहील
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहील आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका स्वीकारेल असे म्हटले. परंतु यासाठी या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांकडून २०% टोल वसूल केला जाईल. तसेच इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची जहाजे मात्र अडवली जातील अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.
होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव
इराण आणि अमेरिका या देशातील संबंध ताणले गेल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहे. याला इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. असे असताना आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या दोन राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ‘मोम्बासा’ जहाजावरील एक भारतीय कर्मचारी ठार झाला. इतर आठ जण जखमी झाले आहेत.






