'इराणनेच जिंकला रणसंग्राम...' खामेनेईंनी बंकरमधूनच केली विजयाची घोषणा, इस्रायलला कडवा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Khamenei declares victory : इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अखेर देशातील जनतेला संबोधित करत इराणच्या विजयाची घोषणा केली आहे. त्यांनी झिओनिस्ट शत्रू म्हणजेच इस्रायलचा पराभव झाल्याचा दावा केला असून, अमेरिका देखील या युद्धात अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. हे भाषण त्यांनी तेहरानमधील एका सुरक्षित बंकरमधून दिल्याचे मानले जात आहे. ही युद्धबंदी २४ जून रोजी लागू झाली आणि त्यानंतरच खमेनींनी हे भाषण दिले. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले, “इराणी राष्ट्र कधीही शरण जात नाही. आमच्या इतिहासाने हे पुन्हापुन्हा सिद्ध केले आहे.”
इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. त्यांचा दावा आहे की, अमेरिकेने युद्धात उडी मारली कारण त्यांना वाटले की जर त्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर इस्रायल पूर्णपणे नष्ट होईल. “या युद्धातून अमेरिका काहीही मिळवू शकली नाही, उलटपक्षी आम्ही त्यांना मजबूत उत्तर दिले,” असे खमेनी म्हणाले. त्यांनी इस्लामिक रिपब्लिकच्या विजयाचा गौरव करताना म्हटले की, झिओनिस्ट राजवट आमच्या आघातांनी चिरडली गेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पैशाने क्लास खरेदी करता येत नाही’, जेफ बेझोस लग्नाच्या कार्डवरून झाले ट्रोल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
New York Times च्या अहवालानुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या सुरक्षादलांनी खमेनींना राजधानी तेहरानमधील एका गुप्त बंकरमध्ये हलवले होते. तिथूनच त्यांनी हा ऐतिहासिक संदेश दिल्याचे समजते. या घोषणेनंतर इराणमध्ये सार्वत्रिक उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरकार समर्थकांनी रस्त्यावर उतरून “इस्लामिक रिपब्लिक जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या आहेत.
जरी युद्धबंदी जाहीर झाली असली तरी इराणची लष्करी सज्जता कायम आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, जर इस्रायल किंवा अमेरिका पुन्हा हल्ला करतील, तर इराण पूर्ण ताकदीने उत्तर देईल. पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या आणि माध्यमांच्या अहवालांनुसार, इराणचा अणुउर्जा कार्यक्रम अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे इस्रायलकडून भविष्यात पुन्हा एकदा कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी देखील पुनःहल्ल्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे येत्या काळात पुन्हा संघर्ष उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका, युनायटेड नेशन्स आणि युरोपियन संघटना दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन करत आहेत. विशेषतः इराणच्या अणुउर्जा कार्यक्रमाविषयी वाढती शंका, खमेनींचे बंकरमधून भाषण, आणि अमेरिका-इस्रायलचा निष्फळ हस्तक्षेप यामुळे मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी समिकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतासाठी वरदान असलेले ‘ब्राह्मोस’ बनवण्यामागे आहे ‘या’ बड्या नेत्याचा वरदहस्त; डॉ. शिवथनु पिल्लई यांचा खुलासा
खामेनेईंच्या या विजय घोषणेने इराणी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असला, तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या भविष्यातील हालचाली, इराणची लष्करी तयारी आणि अणुउर्जा कार्यक्रम यामुळे मध्यपूर्व पुन्हा एका संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. युद्धबंदी तात्पुरती असली तरी, खरा प्रश्न आहे ही शांतता किती काळ टिकणार?