हमासच्या दहशतवाद्यांचे १५०० हून अधिक मृतदेह सापडल्याच इस्रायलचा दावा, हल्ले सुरूच!

इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे १५०० हून अधिक मृतदेह सापडल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. आता इस्रायलही गाझावर हल्ले करत आहे.

    इस्रायल आणि हमास यांच्यात तीन दिवसांपासून युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धात 1600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनीही मारले गेले. इस्रायलच्या सीमेत आता 1500 हून अधिक हमास दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. लष्कराचे प्रवक्ते रिचर्ड हेच यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझा सीमेवर लष्कराने ताबा मिळवला आहे.

    काल संध्याकाळपासून कुठेही घुसखोरी झाली नसून दहशतवादी पुन्हा हल्ला करू शकत नाहीत, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. लष्कराने सीमाभागातील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. कारवाई सुरूच राहणार आहे. इस्त्रायली हल्ल्यात पॅलेस्टाईनमध्ये किमान 700 लोक मारले गेल्याची माहिती आहे. अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक शक्तिशाली देश इस्रायलच्या समर्थनार्थ उभे आहेत. भारतासह अनेक देशांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

    मंगळवारी व्हाईट हाऊसने संयुक्त निवेदन जारी केले आहे. फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनने जारी केलेल्या या निवेदनात हमाससारखी दहशतवादी संघटना खपवून घेतली जाणार नाही, असे म्हटले आहे. अशा हिंसक संघटनांना विरोध करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे. तसेच, या देशांनी उघडपणे इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी त्याच्या पाठीशी उभे राहतील असे सांगितले आहे.

    हमासने ओलिसांना ठार मारण्याची धमकी दिली

    इस्रायली लोकांना ओलीस ठेवल्याचा हमासचा दावा आहे. आता हमास या ओलीसांना ठार मारण्याची धमकीही देत ​​आहे. हल्ल्या दरम्यान हमासने अनेकांना ओलीस ठेवले आणि नंतर त्यांची हत्या केली. बहुतांश ठिकाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली. स्त्रिया, वृद्ध किंवा लहान मुलांचा यामध्ये समावेश होता. 1,000 लोकसंख्या असलेल्या गाझाच्या सीमावर्ती गावात किब्बुजमध्ये किमान 100 लोक मारले गेले. तर, गाझा पट्टीजवळ सुरू असलेल्या म्युझिक फेस्टिवलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत 250 हून अधिक लोकांचा बळी घेतला.