Zaporizhzhia nuclear plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Zaporizhzhia nuclear plant power outage : युक्रेन आणि रशिया( Russia-Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प( Zaporizhia nuclear plant) पुन्हा एकदा धोक्याच्या छायेत आला आहे. युरोपातील सर्वात मोठा असलेला हा प्रकल्प मागील तीन दिवसांपासून पूर्णपणे बाह्य वीजपुरवठ्याविना आहे. अशा परिस्थितीत केवळ डिझेल जनरेटरवर अवलंबून असलेल्या या प्रकल्पामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मंगळवारी प्रकल्पातून बाहेर जाणारी शेवटची उच्चदाबाची वीजवाहिनी अचानक बंद पडली. रशियन बाजूने सांगण्यात आले की, युक्रेनियन सैन्याच्या गोळीबारामुळे ही लाईन खराब झाली असून दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळून लावत, “आम्ही कधीच प्रकल्पावर हल्ला करणार नाही, कारण तो अत्यंत धोकादायक ठरू शकतो,” असा दावा केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार
अणुऊर्जा प्रकल्पात साठवलेले इंधन सतत थंड ठेवणे आवश्यक असते. अन्यथा ते गरम होऊन वितळण्याचा धोका निर्माण होतो. थंड करण्यासाठी बाह्य वीजपुरवठा आवश्यक असतो. तो खंडित झाला की, बॅकअप डिझेल जनरेटर वापरले जातात. सध्या प्रकल्प केवळ अशाच जनरेटरवर चालत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर डिझेलचा पुरवठा खंडित झाला, तर काही आठवड्यांत अणुभट्ट्या अतिगरम होऊन गंभीर अपघात घडू शकतो.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी या परिस्थितीला “अत्यंत चिंताजनक” असे संबोधले आहे. त्यांनी अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, पण तरीही कोणताही ठोस उपाय सापडलेला नाही. दरम्यान, ग्रीनपीस आणि युक्रेनियन अधिकारी याही परिस्थितीला थेट “जगाच्या अणुसुरक्षेसाठी धोका” असेच म्हणत आहेत.
आंतरराष्ट्रीय तज्ञांचा अंदाज आहे की रशिया मुद्दामच या प्रकल्पाला अस्थिर करून जगाला दाखवू इच्छित आहे की झापोरिझिया प्रकल्पाचा ताबा केवळ त्यांच्याकडे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ड्रग्ज विक्रेत्यांशी…’, Bagram Air Base वरून अमेरिकेला घेरणाऱ्या चीनचा पर्दाफाश; अमरुल्लाह सालेह यांचा धक्कादायक दावा
२०११ मध्ये झालेल्या जपानमधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर युरोपियन नियामकांनी अणुऊर्जा प्रकल्प बाह्य वीजपुरवठ्याविना किती वेळ चालू राहू शकतो, याची चाचणी केली होती. त्यावेळी ही मर्यादा ७२ तास निश्चित करण्यात आली होती. झापोरिझिया प्रकल्पाने आता ती मर्यादा ओलांडली आहे. सध्याच्या घडीला अणुभट्ट्या थंड ठेवल्या जात असल्या तरी, परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर अपघाताचा धोका टाळता येणार नाही. तज्ज्ञांचे मत आहे की, फुकुशिमाइतका तात्काळ धोका नसला तरी दीर्घकालीन दृष्टीने ही परिस्थिती जगासाठी अत्यंत धोकादायक आहे.






