इलॉन मस्कने (Elon Musk) ट्वीटर विकत घेतल्यानंतर आता ट्वीटर मध्ये अनेक महत्वाचे आणि मोठे बदल केले जात आहेत. ट्विटरचे संचालक पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीनंतर आता ट्वीटरकडून युजर्सला देण्यात येणाऱ्या ब्लू टिक बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे तुम्हाला जर तुमच्या ट्विटर अकाऊंटपुढे ब्लू टिक हवी असल्यास त्यासाठी तुम्हाला प्रति महिना पैसे मोजावे लागणार आहेत.
ट्विटरची ब्लू टिक म्हणजे अर्थात तुमचं अकाऊंट व्हेरिफाय होणं. आत्तापर्यंत ट्विटरचं व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया अगदी मोफत होती. त्यासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागत नव्हते. पण आता ट्विटरची सूत्रं इलॉन मस्कच्या हातात गेल्यानंतर या व्हेरिफिकेशनसाठी प्रतिमहिना शुल्क आकारलं जाणार आहे. व्हेरिफिकेशनसाठी ट्विटर युजर्सना प्रति महिना २० डॉलर एवढं शुल्क भरावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.






