पाकिस्तानने भारताची घेतली धास्ती? ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर विकासकामे सोडून संरक्षण खर्चात वाढ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तान मोठ्या संकटात अडकला आहे. एकीकडे भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा आणि खोटारडेपणाचा पर्दाफाश केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आर्थिक संकट आणि अंतर्गंत संघर्षात अडकलेला आहे. अशातच पाकिस्तान शाहबाज सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने १ हजार अब्ज पेक्षा अधिक किमितींचे विकास प्रकल्प रद्द केले आहेत. तर भारताच्या भीतीने पाकिस्तानने संरक्षण बजेटमध्ये १८% ने वाढ केली आहे.
यापूर्वी देखील पाकिस्तानने नागरिकांच्या विकासपेक्षा लष्करी खर्चाला प्राधान्य दिले आहे. १० जून रोजी पाकिस्तान अर्थसंकल्पसादर करणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF)च्या अटी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये खर्च कमी करणे आणि महसूल वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. या कर्जाअंतर्गत पाकिस्तानला बजेट तूट कमी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कर्जाची स्थिती सुधारण्यास सांगण्यात आले आहे. २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पात पाकिस्तानने विकास योजनांसाठी केवळ ८८० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे बजेट ठेवले आहे.
सुरुवातील हे बजेट १ हजार अब्ज डॉलर्सचे ठेवण्यात आले होते. पण बलुचिस्तानमधील एन-२५ महामार्गासाठी पंतप्रधान शाहबाज यांनी १२० अब्ज रुपयांची मागणी केली होती. यामुळे नियोजन मंत्री एहसान यांना विकास क्षेत्रातील योजनाच्या निधीत बदल करावा लागला.
पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने आपल्या संरक्षण बजेटमध्ये १८% ने वाढ केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेने पाकिस्तानची घबराट उडाली आहे. भारतासोबतच्या लष्करी तणावामुळे पाकिस्तानने धास्ती घेतली आहे. तसेच सिंधू जल कराराही अद्याप स्थिगीत आहे. यामुळे संरक्षण खर्चात वाढ केली असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानने संरक्षण खर्चात १८% वाढ करुन २.५ ट्रिलियन पर्यंत ती वाढवली आहे.
याशिवाय, भारताच्या प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ल्यात पाकिस्तानकडील चीनची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाली आहे. यानंतर पुन्हा पाकिस्तान चीनकडून नवी संरक्षण प्रणाली विकत घेण्याचा विचार करत आहे. सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात असताना देखील चीनकडून HQ-19 हवाई संरक्षण प्रणाली घेण्याचा विचार करत आहे.
एवढे होऊनही पाकिस्तानच्या भारकविरोधी कुरापती सुरु आहेत. पाकिस्तानने मुस्लिम देशांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या शिष्टमंडळाप्रमाणे पाकिस्तानने देखील आपले शिष्टमंडळ स्थापने केले आहे. या शिष्टमंडळाच्या मदतीने विदेशातील भारताच्या शिष्टमंडळाचे काम रोखणे आणि इतर देशांना आपल्या बाजूने करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरु आहे.