संयुक्त राष्ट्र सभेमध्ये पाकिस्तानने भारतावर गंभीर असे आरोप केले. यावर भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी प्रत्युत्तर दिले
न्यूयॉर्क : आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान देशाने संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये भाषण केले. 79 व्या सत्रामध्ये पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताविरोधात गरळ ओकली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. भारतामध्ये इस्लामोफोबिया वाढत असल्याची तक्रार पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली. पाकिस्तानसारख्या देशाने भारताबाबत महासभेमध्ये केलेल्या तक्रारीनंतर भारताच्या अधिकाऱ्यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी पाकिस्तानचे उत्तरादाखल दिलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.
काय म्हणाल्या भाविका मंगलानंदन?
भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी देशाने संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये पाकिस्तानने केलेल्या आरोपांना उत्तर दिले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका मांडताना त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. जो देश लष्कराकडून चालविला जातो. ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते, त्या देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. आज या महासभेत खेदजनक बाब घडली असून आपण त्याचे साक्षीदार आहोत, असे स्पष्ट मत भाविका मंगलानंदन यांनी व्यक्त केले.
भारतीय भूभाग बळकविण्याची यांची इच्छा
भाविका मंगलानंदन पुढे म्हणाल्या की, पाकिस्तान देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये भारताचा जो उल्लेख केला, त्याबद्दल मी आता बोलत आहे. पाकिस्तान हा शेजारील देशाच्या विरोधात सीमेच्या पलीकडून दहशतवादाचा वापर करत आहे, हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यांनी आमच्या संसदेवर, आर्थिक राजधानी मुंबईवर, बाजार आणि तीर्थयात्रेच्या मार्गावर हल्ले केले. ही यादी बरीच मोठी आहे. अशा देशाने हिंसाचारावर बोलणे म्हणजे यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही. खरे सांगायचे तर पाकिस्तानला भारतीय भूभाग बळकविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच भारताचा विभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा वापर करून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत भाविका मंगलानंदन यांनी पाकिस्ताचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या टीकेवर उत्तर दिले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका मांडताना त्यांनी पाकिस्तानच्या दहशदवादी कुरघोड्यांचा उल्लेख आवर्जुन केला.
भारतामध्ये इस्लामिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न
पाकिस्ताचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 पुन्हा लागू करून शांतता प्रस्थापित करावी. पॅलेस्टाईनमधील जनता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. भारतात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. २० कोटी मुस्लिमांना दमन करण्यात येत असून इस्लामिक वारसा नष्ट करण्याचा आक्रमक प्रयत्न भारतामध्ये होत आहे, असे गंभीर स्वरुपाचे आरोप पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले. यावर भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी पाकिस्तानला इशारा देखील दिला. त्या म्हणाल्या की, शेजारी देशाने हेही लक्षात घेतले पाहीजे की, भारताविरुद्ध सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हा अपरिहार्य परिणामांना आमंत्रण देईल, असा स्पष्ट इशारा भारताकडून देण्यात आला आहे.