आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी; पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच या वर्षाच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र महासभेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला जगभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. या दरम्यान ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली जात आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती आहे. संयुक्त राष्ट्र महासभेची ही बैठक UNGA च्या नजीक होणार आहे. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर देखील त्यांच्यासोबत असतील. या बैठकीत पाकिस्तानातील पुरापासून कतारवर झालेल्या इस्रायली हल्ल्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या UNGA बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेला जाणार आहेत.
संयुक्त राष्ट्रच्या महासभेचे 80 वे अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी सुरू झाले. ही उच्चस्तरीय बैठक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान चालेल. या बैठकीत ब्राझील पहिला वक्ता असेल, तर त्यानंतर अमेरिका महासभेला संबोधित करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना संबोधित करतील. राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळात ते पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.
परराष्ट्रमंत्री जयशंकर अधिवेशनाला करणार संबोधित
परराष्ट्र मंत्री जयशंकर 27 सप्टेंबर रोजी भारतातून अधिवेशनाला संबोधित करतील. मात्र, त्यापूर्वी जुलैमध्ये जाहीर झालेल्या वक्त्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचे नाव समाविष्ट होते. त्या यादीनुसार, पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार होते. वक्त्यांच्या या यादीत आणखी सुधारणा होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.