PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये ७० हजार आंदोलक रस्त्यावर; २० हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
PoK protests rawalakot eidgah ground 2026 : पाकिस्तानच्या अनधिकृत ताब्याखाली असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) परिस्थिती कमालीची हाताबाहेर गेली आहे. पाकिस्तानी लष्कर, रेंजर्स आणि पोलिसांच्या अमानुष अत्याचारांना तोंड देत असतानाही, रावळकोटमधील ईदगाह मैदानावर हजारो लोक गेल्या १२ दिवसांपासून रात्रंदिवस पहारा देत ठाम उभे आहेत. आपल्या मूलभूत हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या काश्मिरी जनतेचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी प्रशासनाने क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली आहे. नियंत्रण रेषेजवळील बट्टल गावातून रावळकोटच्या दिशेने जाणाऱ्या ७० हून अधिक निःशस्त्र आंदोलकांवर पाकिस्तानी रेंजर्सनी अमानुषपणे गोळीबार केला. या संपूर्ण संघर्षात आतापर्यंत ५८ हून अधिक निष्पाप काश्मिरी नागरिकांना पाकिस्तानी सैन्याने गोळ्या घालून ठार केले आहे, ज्यामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या या नरसंहाराचा पर्दाफाश करताना स्थानिक आंदोलक अत्यंत भावूक आणि संतप्त होऊन सांगत आहेत की, त्यांच्या हक्कांची मागणी करणाऱ्या तरुणांना थेट गोळ्या घातल्या जात आहेत आणि त्यांचे मृतदेह देखील त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जात नाहीत. इतकेच नाही तर, आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक काश्मिरी तरुणांना पाकिस्तानी सैन्याने रात्रीच्या वेळी घरातून उचलून गायब केले आहे. हे तरुण सध्या जिवंत आहेत की नाही, ते कोणत्या तुरुंगात आहेत, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. स्थानिक जनतेच्या मते, पाकिस्तानी लष्कर, रेंजर्स, फ्रंटियर कोअर (FC) आणि सिंध पोलीस मिळून पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये जे करत आहेत, तसे अमानुष कृत्य सध्या पॅलेस्टाईनमध्येही घडत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Boeing 747: व्हाईट हाऊसपेक्षाही आलिशान! ट्रम्प यांच्या ताफ्यात दाखल झाले नवे ‘Air Force One’; कतारच्या गिफ्टची जगभरात चर्चा
या मध्यरात्रीच्या ऐतिहासिक आंदोलनाचे मुख्य आयोजक ख्वाजा मेहरान यांनी जाहीर मंचावरून पाकिस्तानी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, ५ जूनपासून काश्मिरी जनतेवर दहशतवादी कारवाया करणारे पाकिस्तानी लष्कर हे स्वतःच्या मर्जीने नाही, तर ड्रग्ज माफियांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मेहरान यांनी दावा केला आहे की, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेले लष्कराचे ब्रिगेडियर फैक अयुब आणि कर्नल जहीर यांचे ड्रग्ज माफियांशी थेट संबंध आहेत आणि याचे ठोस पुरावे आंदोलकांकडे आहेत. हे अधिकारी अंमली पदार्थांच्या तस्करांना वाचवण्यासाठी आणि आंदोलन चिरडण्यासाठी स्थानिक जनतेच्या रक्ताचे पाट वाहत आहेत.
काश्मिरींचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने आता ‘उपासमारीचे’ शस्त्र उपसले आहे. आंदोलनाचा १२ वा दिवस उजाडला तरी पाकव्याप्त काश्मीरच्या सर्व सीमा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. पंजाब आणि इतर प्रांतांतून येणारे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक सीमांवरच अडवून ठेवण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना अन्न आणि पाण्याविना उपाशी ठेवून मारण्याची ही लष्कराची संघटित व्यवस्था आहे. आंदोलनाचे दुसरे एक नेते सरदार उमर नझीर यांनी परिस्थितीची तुलना करताना सांगितले की, ज्याप्रमाणे कर्बलाच्या युद्धात पैगंबरांच्या नातवाला अन्न-पाण्याविना उपाशी ठेवून शहीद करण्यात आले होते, तीच पुनरावृत्ती पाकिस्तानी लष्कर आज काश्मिरी जनतेसोबत करत आहे. मात्र, जनता आता मागे हटणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ram Statue : बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश! ढाक्यात घुमल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा; हजारो लोक रस्त्यावर ‘या’ कारणामुळे रस्त्यावर
संपूर्ण जगापासून हा अत्याचार लपवण्यासाठी पाकिस्तानी सरकारने ५ जूनपासून या भागात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे, जेणेकरून येथील अत्याचाराचे व्हिडिओ आणि बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. असे असूनही, केवळ रावळकोट शहरात ७०,००0 हून अधिक लोकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. या मोठ्या लोकउभारणीला चिरडण्यासाठी पाकिस्तानने २०,००0 हून अधिक लष्करी जवान, निमलष्करी दल आणि सिंध पोलिसांच्या तुकड्या मागवून संपूर्ण पूंछ जिल्ह्याला लष्करी छावणीचे स्वरूप दिले आहे. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. लष्कराच्या या दडपशाहीमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील हे ऐतिहासिक बंड आता पाकिस्तानच्या फाळणीला कारणीभूत ठरेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.






